
अमळनेर(प्रतिनिधी) तालुक्यातील धार येथील एका तरुणाचा नीम (ता. अमळनेर) येथील श्री क्षेत्र कपिलेश्वर यात्रोत्सवास गेला असता नदीच्या त्रिवेणी संगमावर पोहत असताना पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी चारच्या सुमारास घडली. पोलिसांनी सुमारे दोन तासाच्या शोधानंतर मृतदेह बाहेर काढला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
धार येथील अजय राजेंद्र सैंदाणे (वय २५ ) हा सूरत येथे कामाला आहे. महाशिवरात्रीनिमित्त तो धार येथे आपल्या घरी आला होता. त्याचा चुलत भाऊ सिद्धेश्वर सैंदाणे यासोबत तो कपिलेश्वर यात्रोत्सवाला गेला होता. यावेळी अजय हा कपिलेश्वर मंदिराजवळील तापी, गुप्तगंगा व पांझरा नदीच्या संगमावर पोहण्यासाठी उतरला. पोहताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. यावेळी काही तरुणानी तो बूडत असल्याचे पाहुन पटापट नदित उडया मारल्या. मात्र, तो खोल पाण्यात बुडाल्याने त्याला वाचवीणे अशक्य झाले.सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील यांच्यासह पोलिसांच्या ताफा घटनास्थळी हजर होता. काही पट्टेदार तरुण व पोलिसांच्या मदतीने त्याचा मृतदेह सायंकाळी सहाच्या सुमारास पण्यातून काढण्यात आला. त्यानंतर शव विच्छेदनासाठी त्याचा मृतदेह अमळनेर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला.
महाशिवरात्रनिमित्त कपिलेश्वर यात्रोत्सवात भावीकांची मोठी गर्दी होती. महाशिवरात्रीला अशी घटना घडल्याने भाविकांसह परिसरातील ग्रामस्थामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. अजयच्या मागे आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे.