अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील लोण बु. येथे दोन गटात वाद झाले. विनायभंग आणि दगडफेक केल्याचा प्रकार घडला. या वादातून दोन्ही गटांकडून मारवड पोलिसांत परस्पर विरोधी फिर्याद देऊन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की,लोण बु. येथील ३० वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, २९ रोजी सायंकाळी ७:३० वाजता सदर महिला घरी असताना शेजारी राहणारा नरेश महारू पाटील हा बळजबरी घरात घुसला आणि सदर महिलेला पकडून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न लागला. तिचे तोंड दाबून तुला नंतर पाहतो, असे म्हणत कोणाला सांगितले तर पती व मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली. महिलेचा आवाज ऐकून तिची मुले व पती घरात आल्याने नरेश व महिलेच्या पतीची झटापट झाली. त्यावेळी नरेश पळून जात असताना पाय घसरून पडल्याने डोक्याला दुखापत झाली. या प्रकाराने महिला घाबरून गेल्याने उशिराने मारवड पोलिसांत फिर्याद देण्यात आली असून पुढील तपास हेकॉ दिनेश पाटील हे करीत आहेत.
दुसऱ्या गटातर्फे देण्यात आलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी नरेश महारू पाटील हा घरगुती कार्यक्रमासाठी लोण पंचम येथे गेला असता त्याच्या पत्नीने फोन करून कळवले की, शेजारी राहणारे खंडेराव चुडामन पाटील, प्रशांत सुनील पाटील, संदीप खंडेराव पाटील व सुनील चुडामन पाटील हे घरावर दगडफेक करत असून शिवीगाळ करीत आहेत. नरेश हा घरी पोहचला असता प्रशांत याने माझ्या पत्नीला का त्रास देतो, असे म्हणत लोखंडी टॅमीने डोक्यावर मारले. खंडेराव व सुनील यांनी लोखंडी सळई व रॉडने मारहाण केली तसेच संदीप याने लाकडी काठीने मारहाण करत असताना फिर्यादीच्या साडूने त्याची सोडवणूक करत त्याला खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान दिलेल्या जबाबानुसार वरील नमूद चौघांविरुद्ध मारवड पोलिसांत तक्रार दिली असून पुढील तपास पीएसआय विनोद पाटील हे करीत आहेत.