अमळनेर (प्रतिनिधी) नगर पालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा बँकेपासून घरापर्यंत पाठलाग करत दोन दुचाकीस्वारांनी घराजवळून ९ लाख रुपये हिसकावून नेल्याची घटना १० रोजी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, बापू शिंगाणे (रा. भोईवाडा) हे नगरपालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी त्यांची पत्नी सुरेखा हिच्यासह आयडीबीआय बँकेत गेले होते. बँकेतून ९ लाख रुपये काढल्यानंतर त्यांनी ते पिशवीत नीट गुंडाळून पिशवी मोटरसायकलला टांगली आणि पिशवी मांडीत ठेवून घराकडे आले. घराजवळ मोटरसायकल थांबवली असता काळ्या मोटरसायकलवर दोन इसम आले आणि त्यांनी पैश्यांची पिशवी हिसकावून कसाली डीपीकडे पळ काढला. आजूबाजूच्या लोकांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र ते पळून जाण्यात यशस्वी झाले. घटनेचे वृत्त कळताच अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर , डीवायएसपी भाऊसाहेब घोलप, पोलीस निरीक्षक विकास देवरे, पीएसआय नामदेव बोरकर, मंगल भोई, विनोद संदशीव, अमोल पाटील, नितीन कापडणे, रवींद्र पाटील, पूनम हटकर यांनी भेट दिली. बापू शिंगाणे यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक विकास देवरे करीत आहेत.