पातोंडा येथील जलजीवन मिशन अंतर्गत टाकीचे बांधकाम दोन वर्षांपासून थंडबस्त्यात सुरू

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पातोंडा येथील जलजीवन मिशन अंतर्गत टाकीचे बांधकाम दोन वर्षांपासून थंडबस्त्यात सुरू आहे. त्यामुळे हे काम केव्हा पूर्ण होईल आणि नागरिकांना योजनेचा लाभ होईल, असा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

पंतप्रधान यांनी प्रत्येक घराला पिण्याच्या पाण्याची नळ जोडणी व्हावी यासाठी जलजीवन मिशन ही महत्वकांक्षी योजना अंमलात आणली. या योजनेची व्यापक स्तरावर प्रसिद्धी झाली. योग्य ती प्रशिक्षणे देखील दिले गेली. पातोंडा हे दहा हजारांच्या वर लोकसंख्या असलेलं गाव आहे. गावात पिण्याचा पाण्याचा कुठलाच सोर्स नसून पाच किलोमीटर वर असलेल्या तापी काठावरील नालखेडा गावातून भारत मिशन अंतर्गत पाणी पुरवठा होतो. पाणी साठवणूक करण्यासाठी केवळ एकच पाण्याची टाकी असून त्याद्वारे गावाला पाणी पुरवठा केला जातो. गावात एकूण पाच प्रभाग असून जवळपास अकरा व्हॉल्व आहेत. त्यामुळे नागरिकांना सात ते आठ दिवसात पाणी पुरवठा होत असतो. काही नागरिकांकडे पाणी साठवणूक करण्यासाठी आवश्यक जागा नसते म्हणून पाण्याची टंचाई भासून जाते. या कारणाने ग्रामस्थ व पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची होते.गावागावात लोकसंख्यानुसार जलजीवन मिशनसाठी लाखो व कोटी रुपये योजनेसाठी निधी प्राप्त झालेत. गावांतील तळागाळातील प्रत्येक व्यक्तीच्या घरी पिण्याच्या स्वच्छ पाणी मिळावे हा उदात्त हेतू योजनेमागील आहे. गावागावात सदर योजनेची तात्काळ अंमलबजावणी होऊन गावात पाणी पोहोचून टाक्यांचे कामेही पूर्णत्वास आलेत.मात्र पातोंडा येथे सदर योजनेचे काम गेल्या दोन वर्षांपासून थंडबस्त्यात पडले असून नालखेडा येथून आणलेली पाईपलाईन गावाच्या वेशीवर असलेल्या माहिजी देवी मंदिरापर्यंतच पोहोचली असून टाकीचे काम केवळ जमीन पातळी पर्यंत झालेले असून काम पुढे सुरू का होत नाही आहे, याची साधी पुसटशी कल्पना कुणालाच नाही आहे.पाण्याच्या टाकीच्या बांधकाम करण्यासाठी मजूर म्हणून काम केलेल्या पद्माकर वाघ ह्या मजुरांचे दोन महिन्याची मजुरी देखील ठेकेदाराकडून मिळाली नसल्याची त्यांची खंत आहे. गावात सात ते आठ दिवसात पाणी पुरवठा होत असतो.त्यामुळे इतके दिवस पाणी साठवण करणे प्रत्येकाला शक्य नसते त्यामुळे पाण्याच्या टाकीचे बांधकाम लवकर होणे क्रमप्राप्त होते. गावागावात योजना होऊन गावात पाणी शिरले.पण इथे मात्र वेगळेच सुरू आहे. टाकीचे बांधकाम का स्थगित आहे, संबंधित ठेकेदार काम करत नसेल तर वरीष्ठ पातळीवर कार्यवाही होत का नाही असा प्रश्न देखील ग्रामस्थांना वारंवार पडत आहे.

 

मोटर जळण्याचे प्रकार वारंवार

 

      पाच किलोमीटरवर असलेल्या नालखेडा येथून पातोंडा येथे पाणी पोहोचते.मात्र मोटर जळण्याचे प्रकार वारंवार होत असल्याने मोटर जुळणीकरिता दोन तीन दिवस कालावधी लोटला जातो. त्यामुळे कधीकधी पाणी पुरवठा दहा दिवसांवर येऊन ठेपतो. तसेच मोटर काढणे व जोडणे यासाठी देखील ग्राम पंचायतला आर्थिक भार सोसावा लागतो. गाव मोठे असल्याने लग्न, दशक्रिया विधी व इतर कौटुंबिक कार्यक्रम होत असतात. त्यामुळे त्यांना टँकरने पाणी आणून आर्थिक फटका सहन करावा लागतो. वारंवार मोटर जळण्याची तांत्रिक कारणे शोधून त्यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे.तसेच पाणी पुरवठासाठी चार कर्मचारी असून देखील नियोजनाचा अभाव असल्याचे चित्र दिसते.ग्राम पंचायतीचे उत्पन्न कमी असल्याने आवश्यक नसलेले कर्मचारी काढुन ग्राम पंचायतीवरचा आर्थिक भार देखील कमी करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

 

पाण्याच्या साठवणुकीसाठी विहिरीची आवश्यकता

 

      पाच किलोमीटर वरून येत असलेल्या पिण्याचे पाणी साठवणूक करण्यासाठी विहिरीची आवश्यकता आहे.कारण चोवीस तास वीज कनेक्शन असल्याने पाणी साठवून करण्यासाठी एकच टाकी आहे.ग्रामस्थ रात्री पाणी सोडण्यास मनाई करतात त्यामुळे काही पाणी पुरवठा बंद ठेवावा लागतो.प्रत्येक प्रभागाला दिवसा पाणी द्यायचे म्हटल्यास दिवस जास्त लागतात त्यामुळे पाणी साठवून ठेवण्यासाठी विहिरीची गरज आहे.

 

बांधकाम मटेरियलचीही चोर

 

दोन वर्षांपासून टाकीचे बांधकाम रखडले असून त्याठिकाणी वाळू, लोखंड,खडी आदी मटेरियल पडले आहे.मात्र तेथे कुणी पहारेकरी नसल्याने बऱ्याच मटेरियलची त्याठिकाणाहून लोखंड,वाळू,खडी चोरली गेली असल्याचे दिसून येते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *