अमळनेर (प्रतिनिधी) इयत्ता १० वी आणि १२ वीच्या बोर्ड परीक्षा संपूर्णपणे कॉपीमुक्त वातावरणात पार पाडाव्यात, अशी मागणी अमळनेर खाजगी कोचिंग क्लासेस संघटनातर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात शिक्षण विभागाला निवेदन देण्यात आले.हे निवेदन गट शिक्षणाधिकारी तसेच तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, अमळनेर यांना सादर करण्यात आले. यावेळी क्लासेस संघटना अध्यक्ष भैय्यासाहेब मगर, शेखर कुळकर्णी, स्वर्णदीप राजपूत, सुनिल पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.या निवेदनात मागील परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर कॉपी झाल्याचे
नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे गुणफुगवटा झाल्याने गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांना अन्याय सहन करावा लागत आहे. परीक्षा हॉलमध्ये कॉपीमुक्त वातावरण नसेल, तर प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होते, असे मत निवेदनात व्यक्त करण्यात आले आहे. संघटनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात हे कॉपीमुक्त अभियान राबवले जात असून, या संदर्भात परीक्षांमध्ये प्रामाणिकता टिकवून ठेवण्यासाठी कठोर दक्षता घेण्यात यावी व मुक्त कॉपीला आळा बसावा, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.