अमळनेर (प्रतिनिधी) पाच महिन्यापासून बेपत्ता तालुक्यातील बोहरा येथील वृद्धाची कवटी, हाडे आणि इतर अवशेष मिळून आले आहेत. त्याचे कपडे आणि बूट यावरून ओळख पटली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, ऑक्टोबर २०२४ मध्ये बोहरा येथील परशुराम पोपट कोळी (वय ६०) हे बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या मुलाने पोलीसात नोंदवली होती. हा वृद्ध मनोरुग्ण असल्याचे व गुरे चारण्याचे काम करीत असल्याचे ही तक्रारीत नमूद केले होते. बेपत्ता झाल्यानंतर त्यांचा कोणताही तपास लागला नव्हता. मात्र ९ फेब्रुवारी रोजी बोहरा शिवारातील शेतातील गवत वाढलेल्या बांधावर कवटी, हाडे, बूट आणि कपडे आढळून आले. त्यावरून गावात चर्चा झाल्याने बेपत्ता वृद्धांच्या मुलांनी तेथे जाऊन पाहिले असता हे बूट व कपडे त्यांच्याच वडिलाचे असल्याची त्यांची खात्री झाली. त्यावरून त्यांनी सापडलेले अवशेष बेपत्ता असलेल्या परशुराम पोपट कोळी यांचे असल्याची नोंद मारवड पोलिसांत करण्यात आली. त्यांच्या मृत्यूबाबत कोणावरही संशय नसल्याचे ही नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास पीएसआय विनोद पाटील हे करीत आहेत.