पातोंडा येथे शालेय विद्यार्थ्यांचे हाल थांबवण्यासाठी अमळनेर ते चोपडा शटल सेवा सुरू करण्याची मागणी

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील चोपडा रस्त्यावरील पातोंडा गावातील शालेय विद्यार्थ्यांची एसटी बसेससाठी तारांबळ उडत आहे.  त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने अमळनेर व चोपडा आगराने सयूंक्तरित्या शटल सेवेची बस सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांसह पालक वर्गाने केली आहे.

पातोंडा हे गाव लोकसंख्याच्या दृष्टीने मोठे असून पातोंडासह नांद्री, दापोरी, खवशी, दापोरी, दहिवद, मठगव्हाण, रुंधाटी, मुंगसे, खापरखेडा, नालखेडा व गंगापुरी येथील शेकडोच्या वरती प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थी अमळनेर व चोपडा येथे शिक्षणासाठी ये-जा करीत असतात. शालेय वेळ बारा वाजेपासून सुरू होत असल्याने विद्यार्थी हे नऊ वाजेपासून बस स्टॉपवर उभे असतात. परंतु त्याचवेळी चोपडाकडून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या बसेस प्रवाशांनी फुल्ल भरलेल्या असतात तसेच महिलावर्ग व जेष्ठ नागरिकासाठी शासनाने सवलत दिली असल्याने त्यांची संख्या देखील वाढली आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांना जागेअभावी एसटी मध्ये बसविले जात नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना तासनतास ताटकळत उभे रहावे लागत असते. त्यावेळेस विद्यार्थ्यांची एकच झुंबळ उडते. काही बसेस विद्यार्थ्यांची गर्दी बघून थांबत नाहीत. तर काही वाहक मागे गाडी येत असल्याचे सांगत वेळ मारून नेतात. या प्रकाराने एसटी कर्मचारी व विद्यार्थ्यांची बाचाबाची होते. शाळेत उशिरा पोहोचल्याने विद्यार्थ्यांचे सुरवातीचे शालेय तास बुडतात नाहीतर बसेसअभावी त्यांना घरी माघारी परतावे लागते. विद्यार्थ्यांना देखील शाळा प्रशासनाला रोज रोज एसटी बसचे उदाहरण द्यावे लागते. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून अमळनेर व चोपडा आगराने सयूंक्तरित्या एक तासाच्या अंतराने अमळनेर ते चोपडा शटल सेवेच्या बसेस दिवसभर सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांसह व पालकवर्गानी केली असून याकडे लोक प्रतिनिधीनी लक्ष देण्याची ही मागणी केली आहे.

पातोंडा येथे मिनी बसस्थानक मंजूर, पण निधीअभावी काम रखडले पातोंडा हे दापोरी, नांद्री, दहीवद, खवशी, मठगव्हाण, रुंधाटी, मुंगसे, मठगव्हाण, खापरखेडा, नालखेडा, खापरखेडा, गंगापुरी आदी गावांच्या दृष्टीने केंद्रस्थानी असून त्या गावांतील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी पातोंडा येथे येणे हा एकच पर्याय असतो. त्यामुळे येथे प्रवाशांसह विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. ही बाब लक्षात घेता सामाजिक कार्यकर्ते घनश्याम पाटील यांनी त्यांच्या सततच्या पाठ पुराव्याने खासदार स्मिता वाघ यांच्या पत्र व्यवहाराच्या माध्यमातून पातोंडा येथे मिनी बसस्थानक व काँक्रीटीकरणसाठी दोन कोटी रुपये मंजूर झाले आहेत. परंतु निधी अभावी काम रखडले असून निधी लवकर प्राप्त व्हावा यासाठी घनश्याम पाटील हे प्रयत्नशील असून जळगाव विभाग नियंत्रकाकडून व्यवस्थापक संचालक राज्य परिवहन मुंबई सेंट्रल यांना निधी मिळणेकामी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तसेच प्रस्तावित मिनी बसस्थानकासाठी अमळनेर चोपडा रस्त्याला लागून पातोंडा येथे जागा असून त्या जागेवर घनश्याम पाटील यांनी खासदार स्मिता वाघ यांच्याच प्रयत्नातुन संरक्षक भिंत उभारली आहे. त्यामुळे लवकरात लवकर मिनी बसस्थानकासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी खासदार स्मिता वाघ यांच्या माध्यमातून प्रयत्नशील असल्याचे घनश्याम पाटील यांनी सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *