अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर शहरातील अवैध देहव्यापार लवकरच बंद करण्याची ग्वाही माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांनी कैफियत घेऊन आलेल्या नागरिकांना दिली.
शहरात खुलेआम सुरू असलेल्या अवैध देहव्यापाराविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप असून हा प्रकार त्वरित थांबवावा, अशी मागणी होत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशांचे उल्लंघन करून हा व्यवसाय चालवला जात असल्याचा आरोप केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार अनिल भाईदास पाटील यांची शहरातील जबाबदार नागरिकांनी भेट घेतली. यावेळी आमदार पाटील यांनी नागरिकांना आश्वासन दिले की, अमळनेर शहराला लागलेला हा कलंक लवकरच दूर केला जाईल आणि अवैध देहव्यापार तातडीने थांबवण्यासाठी कठोर कारवाई केली जाईल.शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत असताना, प्रशासनाने त्वरित पावले उचलण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. आता प्रशासन आणि पोलीस यावर काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.