भुयारी गटारीच्या कामात पाइपलाइन फुटल्याने हरिओम नगर दहा दिवसांपासून तहानलेलेच

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील हरी ओम नगर भागात भुयारी गटारीचे काम करताना पाण्याची पाइपलाइन फुटल्याने दहा दिवसांपासून त्या भागातील पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. याकडे नगरपालिका लक्ष देत नसल्याने नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहे. त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहे.

शहरातील हरी ओम नगर भागात भुयारी गटारीचे काम करताना ठेकेदाराकडून पाण्याची पाइपलाइन फुटली आहे. त्यामुळे ह्या भागात दहा दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. पाणी नसल्याने नागरिकांना बाहेरून पाणी वाहून आणावे लागत असून रस्त्यातच खड्डे खोदून ठेवल्याने रस्त्याची ही वाट लागली आहे. गेल्या दीड महिन्यापासून एकाच ठिकाणी भुयारी गटारीचे काम सुरू असून ठेकेदार काम रेंगाळत ठेवत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. सदर दुरुस्तीबाबत नगरपरिषद, जीवन प्राधिकरण व ठेकेदार दुर्लक्ष करीत आहे. नगरपरिषद निवडणुकीची तारीख अनिश्चित असल्याने भावी व माजी नगरसेवक ही वॉर्डांत फिरण्याच्या मानसिकतेत नाही. नगरपरिषदेने स्वतः अथवा ठेकेदाराकडून तात्काळ ही दुरुस्ती करून घ्यावी आणि पाणी पुरवठा सुरळीत करावा अन्यथा आंदोलनाचा इशारा हरिओम कॉलनी भागातील नागरिकांनी दिला आहे.

 

दुरुस्ती न झाल्यास आंदोलन छेडणार

 

हरी ओम नगर, प्रसाद नगर भागात भुयारी गटारीच्या कामामुळे पिण्याचे पाणी भेटत नाही. तात्काळ दुरुस्ती न केल्यास आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही.

जयेश सोमवंशी, नागरिक.

 

नागरिकांची समस्या सोडवणार

 

सदर ठिकाणी उद्या मी स्वतः भेट देऊन तात्काळ भुयारी गटारचा प्रश्न सोडवतो अजून काम सुरू आहे. परंतु नागरिकांनी जोडणी केली असेल अथवा काही इतर समस्या आहे ती सोडविण्यात येईल.

संतोष चौधरी, अभियंता जीवन प्राधिकरण. 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *