अमळनेर विधानसभा मतदार संघात “एम” फॅक्टर जोरात
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर विधानसभा मतदार संघात 65.61 टक्के मतदान झाले. मतदारमंध्ये उत्साह असला तरी सायंकाळी लक्ष्मी दर्शनानंतर मतदारांनी केंद्रांवर गर्दी केली होती. पाच मतदान केंद्रांवर यंत्रांमध्ये बिघाड झाल्याने यंत्र बदलण्यात आले. तर मतदार संघात एम फॅक्टर जोरात राहिला. दरम्यान तिन्ही उमेदवारांनी विजयाचा दावा केला आहे.
अमळनेर विधानसभा मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांचे उत्कृष्ट नियोजन आणि पोलीस निरीक्षक विकास देवरे यांच्या चोख बंदोबस्तामुळे निवडणूक शांततेत आणि सुरळीत पार पडली. सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत ४.३ टक्के मतदान झाले होते. ११ वाजेपर्यंत १४ टक्के मतदान झाले होते. ३ वाजेपर्यंत ३९.३४ टक्के मतदान झाले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५५.१ टक्के मतदान झाले. दुपारी 3 वाजेपर्यंत मतदारांमध्ये निरुत्साह दिसून येत होता. मात्र चार नंतर मतदारांची गर्दी वाढत गेली. सायंकाळी गांधलीपुरा ,पवनचौक ,पिळोदा, गोवर्धन , नगरपालिका ,मुडी ,मांडळ अशा बऱ्याच ठिकाणी मतदारांची उशिरापर्यंत गर्दी सुरू होती.
पहाटे साडे पाच वाजता मॉक पोलला सुरुवात झाली. पातोंडा येथील मतदान केंद्र क्रमांक ५७ वर कंट्रोल युनिटचे बटन खराब झाल्यामुळे ते वेळीच बदलावण्यात आले. तर अमळनेर येथील २१० क्रमांकाच्या मतदान केंद्रावर आणि २५९ क्रमांकाचे चोपडायी केंद्रावर बॅलेट युनिटचे बटण खराब झाल्याने तेही वेळीच बदलण्यात आले. मात्र प्रत्यक्ष मतदान सुरू झाले तेव्हा शिरूड येथील २५६ क्रमांकाचे मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅट आणि अमळनेर येथील १३३ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅट च्या पावत्या कट होत नसल्याने तेही बदलण्यात आले. दरम्यान मतदानांनंतर तिन्ही उमेदवारांनी विजयाचा दावा केला आहे.
एम फॅक्टर ठरवणार आमदार
दरम्यान अमळनेर विधानसभा मतदार संघात मराठा समाज, माळी समाज , मुस्लिम समाज आणि मनी (पैसे ) हे परिणाम करणारे घटक ठरणार आहेत.
लांबून मागवले मतदार
सर्वसाधारणपणे लोकसभा आणि विधांनसभा निवडणुकीला बाहेरगावचे मतदार येत नव्हते. ग्रामपंचायतीला एक एक मतदार महत्वाचा असल्याने लांबून मतदार मागवले जायचे. मात्र यंदा चुरस जबरदस्त असल्याने नेहमीप्रमाणे सुरत , मुंबई सह बंगलोर ,राजकोट , चिपळूण , वापी, अंकलेश्वर ,वापी ,प्रितमपूर ,नाशिक , फलटण येथून ऊसतोड कामगार मतदनासाठी आले होते.
महालक्ष्मीचे मतदारांना दर्शन
ग्रामपंचायत, विका सोसायटी, जिल्हा बँक याप्रमाणे मतदारांना महालक्ष्मीचे दर्शन झाले. त्यामुळे अमळनेर विधानसभा मतदार संघातील उलढाल १०० कोटींच्यावर गेल्याची जोरदार चर्चा होती. दुपारी अनिल भाईदास पाटील यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या दुसऱ्या उमेदवाराचा अनुक्रमांक ४ होता. मात्र त्यांच्या नावाने मंत्री अनिल पाटील यांच्या आवाजात मतदानाचे आवाहन करून माझा अनुक्रमांक इतके म्हणण्यापर्यंत आणि नन्तर दुसऱ्या आवाजात चार वर मतदान करावे असे आवाहन करून मतदारांची दिशाभूल करण्याचे कारस्थान करण्यात आले.
खाटेवरून आणले मतदानाला
अमळनेर तालुक्यातील शोभाबाई मगन कोळी (वय ५२) या महिलेच्या दोन्ही किडन्या गेल्या असून डॉक्टरांनी परत पाठवले आहे. त्यांना खाटेवरून मतदानाला आणण्यात आले. मंगरूळ येथील भिकुबाई गंगाराम पाटील वय ९५ याना व्हील चेअरवरून मतदानाला आणण्यात आले.
अकरा विशेष मतदान केंद्रे
अकरा विशेष मतदान केंद्रे सजवण्यात आली होती. मतदान केंद्रांवर लहान मुलांना सांभाळण्यासाठी पाळणाघर उभारण्यात आले होते. कळमसरे येथे अंगणवाडी सेविकांनी मतदारांच्या लहान मुलांना सांभाळले.
मला विजयाचा कौल : मंत्री अनिल पाटील
अमळनेरच्या विकासाचे पर्व आणि शासनाच्या जनहिताच्या योजना यावर अमळनेरच्या मतदारांनी विश्वास ठेवला. दिशाभूल करणाऱ्यांच्या वक्तव्याला अमळनेरकर बळी पडले नाहीत. तालुक्याच्या जनतेने मला विजयाचा कौल दिला असा आत्मविश्वास वाटतो असा दावा मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी केला.
धनशक्तीवर विजय असेल : डॉ अनिल शिंदे
मतदानाचे प्रमाण कमी झाल्याने विजयाची शक्यता , विद्यमान मंत्र्यांवर राग होता , सेवा शक्ती चा धनशक्तीवर विजय असेल असा आत्मविश्वास डॉ अनिल शिंदे यांनी व्यक्त केला.
३० हजारांच्या मताधिक्याने विजयी होईल : माजी आमदार शिरीष चौधरी
निश्चित उत्साहाचे वातावरण आहे. शेतकऱ्यांचा व तरुणांचा संताप ,महिलांचा अपमान यामुळे मंत्र्यांच्या विरोधात वातावरण होते त्यामुळे मी सुमारे ३० हजारांच्या मताधिक्याने विजयी होईल असा दावा माजी आमदार शिरीष चौधरी यांनी व्यक्त केला.