अमळनेर (प्रतिनिधी) वर्षानुवर्षे पुलासाठी संघर्ष करणाऱ्या तालुक्यातील सात्री गावात मतदानासाठी अखेर प्रशासनालाही निवडणूक कर्मचारी आणि ईव्हीएमसह साहित्य बैलगाडीवर नेण्याची वेळ आली. आणि मध्येच बैलगाडी अडकल्याने सात्रीकरांच्या समस्येची जाणीव प्रशासनालाही येऊन गेली.
तालुक्यातील सात्री येथे अमळनेर मतदार संघाचे मतदान केंद्र क्रमांक ७ आहे. या गावाला स्वातंत्र्यपूर्व काळापासून पूल नाही. गाव निम्न तापी प्रकल्प पाडळसरेमध्ये बुडीत क्षेत्रात येत असल्याने गावाला पूल होत नाही आणि नवीन पुनर्वसित गावचे भूखंड वाटप होत नाही. त्यामुळे ग्रामस्थांना पावसाळ्यात समस्यांना सामोरे जावे लागते. निवडणूकीचे साहित्य आणि कर्मचारी घेऊन बस निघाली. डांगरी गावाला आल्यावर कर्मचारी आणि साहित्य बस खाली उतरवण्यात आले. बोरी नदीला पाणी आलेले असल्याने नदीतून एसटी जाणे शक्य नव्हते आणि साहित्य घेऊन कर्मचाऱ्यांना पायी जाणेही शक्य नव्हते. म्हणून सुनील बोरसे यांची बैलगाडी मागवण्यात आली. सर्व साहित्य आणि सर्व कर्मचाऱ्यांना बैलगाडीत बसवण्यात आले. अर्ध्या पाण्यात बैलगाडी आल्यावर वाळूत बैलगाडी फसली. बैलगाडी अडकली म्हणून पोलीस पाटील विनोद बोरसे, सरपंच महेंद्र बोरसे मदतीला धावले. बैलगाडी लोटली आणि पाण्याबाहेर काढली. तेथून कर्मचार्यांना खाली उतरवून वाळूतून पायी केंद्रापर्यंत नेण्यात आले.
बैलगाडी अडकल्याने वाटली भीती
गुडगाभर पाण्यात बैलगाडी अडकली. बैलांकडून गाडी ओढली जात नव्हती तेव्हा भीती वाटली. एखाद्या आदिवासी पाड्यावर आलो की काय असे वाटत होते. पोलीस पाटील विनोद बोरसे यांची मदत झाली.
– तुषार पाटील, केंद्राध्यक्ष मतदान केंद्र ७ , सात्री ता अमळनेर
बैलगाडी उपलब्ध करून देण्याची आधीच केली सूचना
सात्री गावाच्या केंद्राची आधी पाहणी केली होती. पोलीस पाटलांना बैलगाडी उपलब्ध करून देण्याची आधीच सूचना केली होती.
– नितीनकुमार मुंडावरे, निवडणूक निर्णय अधिकारी