निवडणुकीत अपूर्ण पाडळसरे धरण व अस्तित्वातच नसलेली सूतगिरणी ठरली कळीचा मुद्दा

अमळनेर (प्रतिनिधी)  यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अमळनेर तालुक्यात 27 वर्षापासूनचा अपूर्ण पाडळसरे धरण व अस्तित्वातच नसलेली सूतगिरणी हे प्रचारात कळीचे मुद्दे ठरले. यामुळे अमळनेरकर जनता भावी आमदार कोण याचा कौल ठरणार आहे.

अमळनेर विधानसभा मतदारसंघात 8 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून मतदारसंघातील गावागावात व गल्लीबोळात सर्व उमेदवाराचा प्रचार दौरा निवडणुकीत दिवसेंदिवस रंगत आणू  लागले आहेत.  सर्व प्रमुख उमेदवार एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप कॉर्नर सभा, बुथ मेळावे तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून करू लागले आहेत. मतदारसंघात अजून राष्ट्रीय व राज्यस्तरीय नेत्यांच्या प्रचार सभा झाल्या. तालुक्याला सुजलाम- सुफलाम करणारे पाडळसरे  धरण सध्या अपूर्ण अवस्थेत असल्यामुळे मागील 27 वर्षापासून प्रत्येक विधानसभेच्या निवडणुकीला हा कळीचा मुद्दा होत आलेला आहे. तालुक्यातील शेतकऱ्यावर दरवर्षी  कोरडा दुष्काळ, अवकाळी गारपीट, ओला दुष्काळ, यासारखी सुलतानी संकटे येत आहेत. यावर्षी तालुक्यात पावसाळा सरासरीपेक्षा जास्त प्रमाणावर झाल्यामुळे खरीप हंगाम  नाही पण रब्बी हंगाम चांगला येऊ शकणार आहे.पण तालुक्यात शेतीपंपाला  मिळणारा वीज पुरवठा रात्री-बेरात्री व नेहमी खंडित स्वरूपात  मिळत असल्याकारणाने शेतकऱ्यावर मोठ्या प्रमाणावर संकट ओढवते. व ऐन पीक येण्याच्या वेळी या खंडित वीज पुरवठ्यामुळे काबाळ-कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचा तोंडाशी आलेला सुखाचा घास हिरवला जातो. पाडळसरे धरणाचे पाणी उपसा सिंचन योजनेद्वारे आपल्या शेताच्या बांधापर्यंत येण्यासाठी दोन तप पूर्ण  होऊन देखील प्रत्येक विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी पाडळसरे धरण पूर्ण करण्यासह इतर आश्वासनांची खैरात निवडणुकीत उभे राहिलेले सर्व उमेदवार देऊन जातात आणि आजपर्यंत निवडून आलेल्या सर्वच आमदार या धरणाचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतीच्या बांधापर्यंत पोहोचवू  शकलेले नाहीत. ही मोठी व्यथा तालुक्यातील शेतकरी प्रचारादरम्यान उमेदवारांसमोर व्यक्त करत आहे.  त्याचबरोबर 2014 मध्ये एकच ध्यास, शेतीला पाणी आणि हाताला काम हे ब्रीदवाक्य घेऊन नंदपुत्र अपक्ष आमदार झालेल्या माजी आमदारांनी तालुक्यातील नंदगाव शिवारात राजमाता जिजाऊ शेतकरी सहकारी सुतगिरणी उभारण्याचे स्वप्न  दाखविले. पण ते आजपावतो प्रत्यक्षात साकार झाले नसल्याकारणाने तालुक्यातील बेरोजगार युवकांना आजही रोजगारासाठी व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी नाशिक, पुणे,मुंबई, सुरत,अंकलेश्वर या ठिकाणी नाईलाजास्त आपले गाव सोडून स्थायिक व्हावे लागत आहे. हे दोन्ही तालुक्यातील जिव्हाळ्याचे मुद्दे  प्रामुख्याने प्रचाराच्या दरम्यान कळीचा मुद्दा ठरले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *