कृ ऊ बा समितीचे माजी सभापती प्रफुल्ल पाटील यांचा आरोप
अमळनेर (प्रतिनिधी) आपले स्वयंघोषित भूमिपुत्र म्हणारे अनिल पाटील यांचे एकच स्वस्वार्थ हाच परमार्थ असल्याचे सूत्र आहे, असा आरोप त्यांचे दोन दशकांचे साथीदार आणि साक्षिदार राहिलेले प्रफुल्ल पाटील यांनी केला. त्यांचे अनुभव कार्यकर्ते आणि जनतेच्या डोळे उघडणारे असेच आहेत.
प्रफुल्ल पाटील यांनी म्हटले आहे की, कोरोना महामारीच्या काळात चौधरीबंधुंनी रेमडेसिवीर उपलब्ध करून दिले. त्यामुळे कोणाची आई, कोणाचे वडील, कोणाचा भाऊ, कोणाची भावजायी, कोणाचा नवरा, कोणाची बायको, कोणाची बहिण, कोणाचे पाहुणे तसेच कोणाचे ना कोणाचे तरी जवळचे व लांबचे नातेवाईक वाचले. तुम्ही पहिल्या आणि दुसर्याही लाटेत कुठे होते, याचे उत्तर जनतेला द्यावे. असा जनतेला पडलेले काही प्रश्न उपस्थित केले असून त्याची उत्तरे मंत्री महोदयांनी जाहिर मंचावरुन द्यावीत त्यासाठी हा अट्टाहास. आपण पाच वर्ष कार्यकर्ता ओळखला नाही, समाज ओळखला नाही. आणि ऐन निवडणुकीवेळी तुम्हा पुळका सुटला आहे. तुमचे प्रेम पुतना मावशीसारखे किती बेगडी आहे, आपणास लोकांच्या समोर जाण्यास का लाज वाटत आहे, हे आम्ही तुम्ही आणि जनताही जाणुन आहे. चौधरी बंधुंची बरोबरी करू शकत नाहीत म्हणून तुम्ही नाहक बदनामी करत आहात. ही जनता जनार्दन आहे, ती सुज्ञ आहे. तुम्ही कितीही अवडंबर माजवला तरी जनता माज उतरवल्याशिवाय राहणार नाही, ही मात्र काळ्या दगडावरची पांढरी रेघ.
दुसर्यांवर चिखलफेक का…
तुम्ही राष्ट्रीय संपत्ती असलेल्या गौण खनिजाचे निस्सारण केले. तुम्ही भूमातेचे वस्रहरण करत तिला ओरबाडले, शासनाला चूना लावला. आपला करोडो रूपयांचा घोटाळा समोर येईल म्हणून तुम्ही दुसर्यांवर चिखलफेक करत आहात का. अहो हिंमत असेल तर बरोबरी करा बदनाम्या काय करताय. चौधरीबंधूंची सूतगिरणी आहे तेथेच आहे आणि राहील. याचा निर्वाळा त्यांनी वेळोवेळी केला आहे. त्याही पुढे जावून मतदारसंघाच्या चारही कोपर्यांना त्यांची उद्योग धंदे आणण्याची तयारी आहे. पण ज्याची तुम्ही लयलूट केली त्या राष्ट्रीय संपत्तीचे परत निर्माण करू शकणार आहात का? ते लोकांच्या समोर जावून सांगाना.
स्वतने किती हातांना काम दिले
आपण कॅबिनेट मंत्री होतात. ९० कोटी सूतगिरणीला मंजूर होते. तुम्हीच हे पैसे थांबवल्याचे पत्रकार परिषदेत जाहीररित्या सांगितले. यावरून आपण किती निदर्यी आहात आणि आपणास जनतेचा, सुशिक्षित बेरोजगारांचा किती कळवळा आहे याची प्रचिती आणि अनुभूती अमळनेर मतदारसंघाला आलेली आहे. सूतगिरणी अनुभवी लोकांच्या हातात चालवायला देणे म्हणजे घोटाळा होत नाही. महाराष्ट्रातील अनेक सूतगिरण्या अनुभवी चालवत आहेत. धुळ्याच्या जवाहर सूतगिरणीचे उदाहरण समोर आहे. रोजगार निर्मितीच्या चांगल्या कामात तुम्ही खोळंबा का घातला ? मग स्वतातरी किती हातांना काम दिले. किती उद्योग धंदे आणले. ते तरी लोकांना सांगा.
कोरोना काळात मदत केल्याचा अवडंबर
अहो चौधरी बंधू कोणत्याही पदावर नसताना त्यांनी लोकांची जबाबदारी स्विकारली. स्वतःचा जीव जोखमित घालत सामाजिक बांधिलकी जोपासत रेमडेसिवीर तर उपलब्ध करून दिलेच पण ते तेवढयावर थांबले नाहीत. त्यांनी स्वखर्चाने पदरमोड करत गावागावात धुरळणी, फवारणी आणि सॅनिटायझर केले. आणि तुम्ही दलाल गोदी मीडियाला हाताशी घेवून रेशनवाल्यांना धमकावत. दानशुरांकडून मदत घेवून कोरोना काळात स्वताच्या नावाने मदत केल्याचा अवडंबर माजवला हे सर्वज्ञात आहे.
आमसभा का घेतली नाही….
तुम्ही पाच वर्षात एकदाही जनता दरबार म्हणजे आमसभा का भरवली नाही. तुम्ही गावात आणि शहरात एकही जाहीर सभा का घेतली नाही. तुम्हाला का अटकाव होत आहे. तुम्हाला जनता प्रश्न का विचारत आहे. तुम्ही जर लोकाभिमुख कामे केली असती तर जनतेने तुमची अडवणूक केली नसती. तुम्हाला डोक्यावर घेतले असते. चौधरीबंधू गावागावात आणि चौकाचौकात सभा घेत आहेत. हिंमत असेल तर तुम्हीही सभा घेवून दाखवाच.
कार्यकर्त्याचे खच्चीकरण केले
२० वर्षांपासून आम्ही आमच्या गटातून तुम्हाला प्रतिनिधीत्व देत आहोत. सांगा तुम्ही भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँगेसचा कोणता कार्यकर्ता मोठा केला. कोणाचे राजकीय पुनर्वसन केले. पक्ष संघटन वाढवण्यासाठी काय प्रयत्न केले. अहो स्वतःच्या घरात लाभाची सर्व पदे घातली. पक्ष वाढवला नाही. आपण भाजपमध्ये आणि राष्ट्रवादीतही पक्षाचे नुकसान केले. कार्यकर्त्यांचे खच्चीकरण केले. आम्ही तुमची नस नस ओळखून आहोत. पाच वर्षात आपण २५०० कोटी रूपयांचा निधी आणल्याचा आव आणला पण आपण कधीच भाजपच्या कोणत्याही पदाधिकारीकडून नारळ वाढवून घेतला नाही. त्यामुळेच विकासाचा शाश्वत चेहरा असलेल्या शिरीषदादांसोबत आहोत. तुमच्या सोबत शरीराने सक्रिय असलेल्या कार्यकर्त्यांनीही सावध पावित्रा घ्यावा, अशी माझी कळकळीची विनंती आहे, असे त्यानी म्हटले आहे.