एकाच कुटुंबातील काका, पुतण्या, चुलत भाऊ, बहीण शासकीय नोकरीत झाले रुजू

अमळनेर (प्रतिनिधी) एकाच कुटुंबातील काका, पुतण्या चुलत भाऊ, बहीण असे चार जण राज्य सेवा स्पर्धा परीक्षा देऊन शासकीय सेवेत रुजू झाल्याचा लौकिक तालुक्यातील मंगरूळ गावाला मिळाला आहे. या वेळी ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करत त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. तर चारही जण गावातील बेरोजगार  तरुण तरुणींसाठी प्रेरणादायी ठरणार आहेत.

तालुक्यातील मंगरूळ येथील गिरीश अनिल भदाणे आणि दामिनी अनिल भदाणे या भाऊ बहिणींचे शालेय शिक्षण सुरू असतानाच मातृछत्र हरपले. तर वडील चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत. वडिलांनी आई आणि वडील अशा दोन्ही भूमिका निभावून मुलांचे संगोपन आणि शिक्षण केले. त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष दिले. गिरीश हा नवी दिल्ली एथिल पर्यावरण मंत्रालयात स्टेनोग्राफर म्हणून रुजू झाला , तर दामिनी देखील नवी दिल्ली येथील मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून रुजू झाली आहे. त्याचप्रमाणे शिक्षक संजय शिवाजी भदाणे यांचा मुलगा प्रीतम संजय भदाणे हा वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट नगरपरिषदेत नगर अभियंता म्हणून रुजू झाला आहे. विशेष म्हणजे प्रीतम चार विविध स्पर्धा परीक्षा पास झाला होता. त्याला पाणी पुरवठा अभियंता , जलसंवर्धन अधिकारी, नगर अभियंता, कनिष्ठ सहाय्यक अभियंता अशा चार ऑर्डर आल्या होत्या. त्यापैकी त्याने नगर अभियंता म्हणून नोकरी स्वीकारली आहे. तर प्रीतमचे काका प्रशांत शिवाजी भदाणे हे माजी सैनिक होते. सैन्य दलातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुजू झाले आहेत.

एकाच कुटुंबातील चारही जण अवघ्या काही कालावधीत शासकीय सेवेत रुजू झाल्याने गावकऱ्यांना आनंद झाला असून गावकऱ्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *