अमळनेर (प्रतिनिधी) शहरात थंडीची चाहुल लागल्याने उत्तर प्रदेशातील उबदार स्वेटर विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटायला सुरुवात केली आहे. त्यांच्याकडे ५०० ते २५०० रुपयांपर्यंत स्वेटर उपलब्ध आहेत.
नोव्हेंबर महिन्यातच गेल्या चार-पाच दिवसांपासून थंडी जाणवू लागली आहे. त्यामुळे दरवर्षी शहरात धुळे रस्त्यावर जुन्या पोलिस कर्मचारी वसाहतीजवळच स्वेटर विक्रेते आपली दुकाने थाटतात. हे विक्रेते साधारण जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत येथे थांबतात. तालुक्यात बागायती शेतीचे प्रमाण अधिक असल्याने शिवाय यावर्षी सरासरीपेक्षा पाऊस जास्त झाल्याने सर्व नदी, नाले-ओढे तुडुंब भरले असल्याने तालुक्यात बागायती शेतीचे प्रमाण अधिक असणार आहे. तापी नदीवरील अपूर्ण पाडळसरे सिंचन प्रकल्पाचा जलसाठा तसेच तालुक्यातून वाहणाऱ्या पांझरा, बोरी, चिखली, माळण या नद्यांवरील लघु तसेच मध्यम सिंचन प्रकल्प, कोल्हापुरी व लहान मोठे सिंचन बंधारे शंभर टक्के भरले असून ते आजही ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे थंडीचे प्रमाण शहर व तालुक्यात अधिक असणार आहे.
शहरातील मुख्य रस्ता असलेल्या धुळे रस्त्यावर स्वेटर विक्रेत्यांकडून तीन दुकाने थाटण्यात आली आहेत. ही दुकाने धुळे रस्त्यावर बस स्थानक व मुख्य बाजारपेठ असलेल्या भागात असल्याने नागरिकांची खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे.
मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत स्वेटर उपलब्ध
आमच्याकडे लहान मुलांपासून ते ज्येष्ठ व्यक्तींसाठी स्वेटर विक्रीला आहेत. त्याशिवाय मफलर, कानटोप्या, हात मोजे, कंबळ इत्यादी विक्री केली जातात. सर्व स्वेटर व उबदार कपडे पंजाब राज्यातील अमृतसर, जालंदर, दिल्ली, लुधियाना येथून मागवले जातात. आतापर्यंत चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
गयासिंग राजपूत स्वेटर विक्रेता, कानपूर (उत्तर प्रदेश)