अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा विषय असेल, दुष्काळाचे पैसे असतील तसेच हमीभावाचा विषय असेल सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्याच्या अतोनात नुकसान झाले आहे, त्यावर लोकप्रतिनिधी बोलायला तयार नाहीत. संपूर्ण राज्यातील शेतकरीवर्ग राज्य सरकारच्या कारभाराला कंटाळलेला आहे. त्यामुळे अमळनेरात परिवर्तन होऊन महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन होईल असा आशावाद राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या ज्येष्ठ नेत्या व प्रदेश सरचिटणीस तिलोत्तमा पाटील यांनी व्यक्त केला आहे.
त्या म्हणाल्या, निवडणुकीच्या तोंडावर महिला वर्गाला लाडक्या बहिणीचे आमिष दाखवून दैनंदिन गरजांच्या वस्तूंमध्ये भरमसाठ वाढ करून एका हाताने दिलेले पैसे दुसऱ्या हाताने सरकार काढून घेत आहे. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत निश्चितच परिवर्तन होणार आहे. अमळनेर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असलेले डॉ.अनिल शिंदे यांना मतदारसंघातील युवक, महिला, जेष्ठ नागरिक, शेतकरी व कष्टकरीवर्गाचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभत असून या सर्वांचा उत्साह बघून महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.अनिल शिंदे हे मोठ्या फरकाने विजयी होतील. या राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होईल असा विश्वास तिलोत्तमा पाटील यांनी व्यक्त केला आहे.