अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील ढेकू रोड,सानेनगर व ग्रामीण रुग्णालय परिसरातील रस्त्यावरील पथदिवे अनेक दिवसांपासून बंद आहेत. दिवाळीतही नागरिकांना अंधाराचा सामाना करावा लागला. दिवाळी संपूनही पालिकेला जाग येत नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.
नगरपरिषदेने शहरातील पथदिवे देखभाल- दुरुस्तीसाठी एक वर्षाचा ठेका मे. विश्व इलेक्ट्रिकल्स, ठाणे यांना दिलेला आहे. मात्र ढेकू रोडवरील दीपक नगरपासून ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयापर्यंत असलेले पथदिवे मागील काही दिवसापासून बंद अवस्थेत असून पथदिव्यांच्या खांब्यावर वेलींचा विळखा मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. तसेच या रस्त्यावर मोठ्या संख्येने नागरिक पहाटे व संध्याकाळी पायी फिरण्यास जात असतात. अंधार असल्यामुळे वाहनांची धडक लागून दुर्घटना होण्याची शक्यता आहे. तसेच अंधार असलेल्या या ठिकाणाचा फायदा घेऊन महिलांच्या सोनसाखळी चोरण्याचे प्रकार पण घडू शकतात. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. सदरील कामे लवकरात लवकर करून नागरिकांची होणारी गैरसोय थांबवावी. अशी मागणी शहरातील पथदिवे बंद असलेल्या परिसरातील नागरिकांनी केली आहे.
सानेनगरात भागात कसरत
शहरातील एकमेव विप्रो औद्योगिक कारखाना असलेल्या सानेनगर भागात रेल्वे बोगद्यापासून ते सानेनगर पावेतो पथदिवे गेल्या अनेक दिवसापासून बंद असल्यामुळे येथील व्यापारी, विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर, प्रवासी, महिला व लहान मुले यांना रात्रीच्या वेळेस अंधारातून वाट शोधत घरी जावे लागत आहे. तसेच विप्रो कंपनी लगत असलेली मोठी गटार आणि रस्ता यामध्ये अंतर कमी असल्याने वाहनधारकांना वाहने घेऊन जाताना मोठी कसरत करावी लागत आहे.
ग्रामीण रुग्णालय परिसरातही हाल
ग्रामीण रुग्णालय परिसरातील पथदिवे गेल्या महिन्याभरापासून बंद असून रुग्णालयात रात्री अप-रात्री रुग्ण दाखल होत असतात. त्यामुळे रुग्णांना येण्या जाण्यासाठी त्रास होत आहे. तसेच शव विच्छेदन गृहाजवळील हायमास्ट लॅम्प देखील बंद आहे. त्यामुळे परिसरात पूर्णतः अंधार पसरलेला आहे. ग्रामीण रुग्णालय परिसरातील पथदिवे बंद असणेबाबत वैद्यकीय अधीक्षक यांनी २७ सप्टेंबर रोजी मुख्याधिकारी, अमळनेर यांना पत्रव्यवहार केला असून एक महिना होऊन देखील नगरपरिषदेच्या विद्युत विभागाला पथदिवे सुरू करण्याचा विसर पडला आहे.
अन्यथा आंदोलन छेडू
सानेनगर मधील मुख्य रस्त्यावरील पथदिवे गेल्या अनेक दिवसापासून बंद असल्याने परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले असून त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. नगरपरिषदेने त्वरित बंद पडलेले पथदिवे चालू करावेत. अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल.
–दीपक पवार, नागरिक, सानेनगर
पहाणी करून कार्यवाही करू
नुकताच पदभार घेतला असल्याने शहरातील विविध प्रभागात बंद असलेले पथदिवे प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित ठेकेदाराकडून त्वरित सुरू करण्यात येतील.
–कुणाल महाले, विद्युत अभियंता, अमळनेर