अमळनेर (प्रतिनिधी) शहरात नव्यानेच सुरू झालेल्या एस. एस. सिनेप्लेक्सच्या जनरेटरला आग लागल्याने धूर होऊन प्रेक्षकांचा जीव गुदमरू लागला. त्यामुळे दोन्ही चित्रपट गृहातील प्रेक्षकांची एकच धावपळ उडाली. वेळीच अग्निशमन दल पोहचल्याने आग आटोक्यात येऊन रात्रीचा ९ चा शो पूर्ववत सुरू करण्यात आला. ३ रोजी सायंकाळी ही घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, जनरेटर तळमजल्यावर खाली ठेवलेले असल्याने धोका काहीच नव्हता. मात्र धूर वर दुसऱ्या मजल्यावर चित्रपट गृहात गेल्याने हर्षदीप पाटील व आर्यन साळुंखे यांना गुदमरल्यासारखे झाल्याने त्यांनी गेटकीपर ला सांगितले. गेटकीपर इमर्जन्सी दरवाजा उघडत नव्हता. श्वास कोंडले जात होते. दरवाजा उघडताच सर्व प्रेक्षक बाहेर पडले. अग्निशमन दल प्रमुख दिनेश बिऱ्हाडे, जाफर पठाण, फारुख शेख, आनंदा झिम्बल, आकाश संदानशिव, योगेश कंखरे, आकाश बाविस्कर यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. घटनास्थळी एपीआय जगदीश गावित, पोलिस उपनिरीक्षक युवराज बागुल, अमोल पाटील, जितेंद्र निकुंभे, योगेश सोनवणे, मिलींद बोरसे, गणेश पाटील, उदय बोरसे, नगरपरिषद अभियंता डिगंबर वाघ उपस्थित होते. आग विझवल्यांनर जनरेटर दुरुस्त करून रात्री ९ पासून पुन्हा चित्रपट सुरू करण्यात आले.