अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील कलाली शिवारातील शेतरस्त्याची समस्या कोणताही लोकप्रतिनिधी सोडवत नसल्याने शेतकऱ्यांनी स्वयंप्रेरणेने निधी गोळा करून दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली.
तर आता लोकप्रतिनिधी यांना मटपेतीतून उत्तर देऊ असा निर्धारही या शेतकऱ्यांनी केला आहे.
अमळनेर तालुक्यातील कलाली येथील कोल्ही शिवारात सुमारे १०० शेतकऱ्यांची ४०० एकर बागायती शेती असून तापी नदी काठावर खोऱ्यात ही शेती असल्याने उत्पन्न चांगले येते. मात्र या शेतातून माल ने आण करण्यासाठी एकच रस्ता आहे. या तीन किमी रस्त्यावर खैऱ्या व लेंढ्या असे दोन मोठे व सात ते आठ लहान नाले आहेत. तापी काठावरील चिकन मातीमुळे या रस्त्यावर जून ते डिसेंबर महिन्यापर्यंत दोन ते तीन फुटापर्यंत गारा चिखल झालेला असतो. या परिसरात शेतकरी केळी, कापूस, पपई अशी बागायती पिके घेतात. मात्र सप्टेंबर पूर्वी माल ने आण करताना हाल होऊ नयेत म्हणून ते उशिरा लागवड करतात. परंतु त्यामुळे त्यांच्या उत्पन्नावर परिणाम होतात. तसेच मालाला उशिरा भाव मिळत नाही. काढलेला माल शेतातून घरी किंवा बाजारात नेण्यासाठी ३०-३५ टक्के फक्त वाहतूक खर्च येतो. गेल्या अनेक पिढ्यांपासून ही समस्या असून या परिसरातील शेतकऱ्यांनी अनेकवेळा लोकप्रतिनिधींकडे शेतरस्त्याची मागणी केली. मात्र त्यावर कोणीही लक्ष देत नसल्याने शेतकऱ्यांनी स्वतः पुढाकार घेत एका बिघ्यामागे दोन हजार रुपये वर्गणी ठरवून निधी गोळा करायला सुरुवात केली आहे. त्यातून जेसीबीद्वारे रस्त्याचे सपाटीकरण करत दोन्ही बाजूला पाण्याचा निचरा होण्यासाठी चारी खोदणार आहेत. त्यानंतर मुरूम टाकून डागडुजी केली जाणार आहे. फक्त आश्वासन देऊन बोळवण करणाऱ्या आजी, माजी उमेदवारांना मतपेटीतून उत्तर देण्यात येईल, असेही परिसरातून बोलले जात आहे. या रस्ता दुरुस्ती कामी राहुल भागवत पाटील, मनोज पाटील दिपक पाटील, ज्ञानेश्वर पाटील, गोपाल पाटील, भगवान पाटील, शेखर पाटील, मधुकर पाटील, विनोद पाटील यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी पुढाकार घेत कामाला सुरुवात केली आहे.