अमळनेर (प्रतिनिधी) शिवीगाळ करू नका असे सांगायला गेलेल्या एकाला लोखंडी रॉड मारून जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना २८ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता फरशी रोड नदी किनाऱ्यावर घडली. याप्रकरणी पाच जणांसह इतर दोन जणांवर ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, संतोष श्रावण बिऱ्हाडे (वय ४० रा. फरशी रोड नदी किनारा) हा २८ रोजी दुपारी ३ वाजता घरून बाजारात जाण्यासाठी दुपारी ३ वाजता निघाले असता गल्लीतील अब्दुल रहीम बेलदार उर्फ दिलावर, मुन्ना बिलास खाटीक, तोसिफ ताहेर बेलदार, सलमान बाबा फकीर उर्फ फुटया, मुज्या बेलदार (पूर्ण नाव माहीत नाही) व इतर दोन जण आपसात शिवीगाळ करीत होते. त्यावेळी संतोष त्यांना सांगायला गेला की घरात महिला आहेत, तुम्ही माझ्या घरासमोर शिवीगाळ करू नका. हे सांगण्याचा त्यांना राग आला आणि दिलावर याने शर्टाची कॉलर पकडून संतोषच्या कानफटात लगावली. संतोषची आई हिराबाई संतोषला सोडवायला गेली असता सलमान याने हिराबाईचे दोन्ही हात पकडून दिलावर याने तिला चापटांनी मारहाण केली. आणि जातीवाचक शिवीगाळ केली. याना इथे राहू देऊ नका, घर जाळून टाका म्हणत धमकी दिली. संतोष त्याच्या आईला सोडवायला गेला असता दिलावर याने रिक्षातून लोखंडी रॉड काढून संतोषच्या तोंडावर मारल्याने त्याचे सहा दात पडले, तोंडातून रक्तस्राव होऊ लागला. जबड्याला मार लागून तो चक्कर येऊन खाली पडला. संतोषला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. त्याला काहीच बोलता येत नव्हते. तेथून डॉक्टरांनी त्याला धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. उपचार घेऊन परत आल्यावर अमळनेर पोलिसात फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास डीवायएसपी करीत आहेत.