अमळनेरात पार पडली पत्रकारांची कार्यशाळा,योजनांची मिळाली माहिती
अमळनेर (प्रतिनिधी)-कायद्यापुढे पत्रकार हा सर्वसामान्य नागरिकासारखाच असतो,एखाद्या पत्रकारावर संकट येते तेव्हा संघटनेची गरज भासते यासाठी संघटना मजबूत असली पाहिजे पत्रकारिता म्हणजे सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे पवित्र कार्य असून उत्तम पत्रकार होण्यासाठी विविध बाबीसंबंधी ज्ञान व कौशल्य आवश्यक आहे.असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क महासंचनालायातून माहिती संचालक पदावरून सेवानिवृत्त झालेले देवेंद्र भुजबळ यांनी अमळनेर येथे आयोजित पत्रकारांच्या कार्यशाळेत केले.
अमळनेर शहर व तालुका पत्रकार ,संघटना व मराठी वाड्मय मंडळ,प्रा र का केले सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारांच्या कार्यशाळेचे आयोजन म वा मंडळाच्या रावसाहेब नांदेडकर सभागृहात करण्यात आले होते,यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेल्या श्री भुजबळ यांनी पत्रकारांसाठी असलेल्या विविध शासकीय योजना व सवलती याबाबत पत्रकारांना माहिती दिली,यावेळी व्यासपीठावर म वा मंडळाचे उपाध्यक्ष तथा मसापचे कार्याध्यक्ष रमेश पवार व पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत होते,सुरवातीला दिपप्रज्वलन व आद्य पत्रकार श्री बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले,यानंतर प्रमुख वक्ते श्री भुजबळ तसेच महाराष्ट्र राज्याच्या कला व सांस्कृतिक मंडळावर निवड झाल्याबद्दल रमेश पवार यांचा सत्कार करण्यात आला.प्रास्तविक मंडळाच्या विश्वस्थ सौ वसुंधरा लांडगे यांनी केले,यावेळी कार्यशाळेत मार्गदर्शन करताना श्री भुजबळ पुढे म्हणाले की आज पत्रकारिता या व्यवसायात उत्तम पगार, प्रसिद्धी सामाजिक प्रतिष्ठा, अनेक सोयी-सुविधा, परदेश प्रवासाच्या संधी उपलब्ध आहेत पण हे सर्व पत्रकारांचे वैयक्तिक फायदे झालेत .खऱ्या अर्थाने पत्रकारिता व्यवसाय म्हणून स्वीकारताना याचा समाज हितासाठी समाजाच्या उन्नतीसाठी कसा उपयोग करता येईल याचाही विचार करणे अपेक्षित असते.स्वातंत्र्य पूर्व काळातील पत्रकारिता एका विशिष्ट उद्दिष्टांसाठी असायची पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पत्रकारितेवर लोकांचा विश्वास राहिला नाही म्हणून आपण पत्रकारीता करताना जे सत्य आहे तेच देण्याचा प्रयत्न करावा, पत्रकारांची संख्या वाढली आहे.पण किती पत्रकारांना पत्रकारिता समजते हा पण संशोधनाचा विषय होऊ शकतो.काही जण पत्रकारिता मिरवून समाजात वेगळे असल्याचा दाखवण्याचा प्रयत्न करतात. पत्रकारांनी संघटन वाढवणे खूप गरजेचे असून यामाध्यमातुन पत्रकारांसाठी विविध योजना राबविल्या पाहिजेत असा मौलिक सल्ला त्यांनी दिला.
यावेळी पत्रकारांना दैनंदिन जीवनात निर्माण होणाऱ्या समस्या या संदर्भामध्ये ज्येष्ठ पत्रकार पांडुरंग पाटील, सुभाष पाटील घोडगावकर, जगन्नाथ बडगुजर, मरसाळे, जितेंद्र ठाकूर,मिलिंद पाटील, यांनी प्रश्न विचारले. त्यांच्या समस्यांचं निरसन देवेंद्र भुजबळ यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाटील यांनी तर आभार उमेश काटे यांनी मानले यावेळी म वा मंडळाचे प्रा डॉ पी जे जोशी,नरेंद्र निकुंभ, जेष्ठ पत्रकार गं.का.सोनवणे,सिनेट सदस्य दिनेश नाईक,किरण पाटील तसेच अमळनेर तालुका व शहरातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.अमळनेरात प्रथमच पत्रकारांची कार्यशाळा झाल्याने पत्रकार बांधवांनी समाधान व्यक्त केले.यासाठी म वा मंडळाचे अध्यक्ष डॉ अविनाश जोशी व कार्यकारी मंडळ यांनी विशेष सहयोग दिल्याने तसेच लायन्स क्लब अमळनेर यानीही सहकार्य केल्याने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.