अमळनेर (प्रतिनिधी) शेतमजुरीचे पैसे दिले गेले, असे सांगिल्याचा राग आल्याने शेतमजुराने शेतमालकाच्या मानेवर व कानावर वार ब्लेडने करून जखमी केल्याची घटना २३ रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास निमझरी येथे घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रावसाहेब चिंधु पाटील यांच्याकडे देविदास दगा कोळी हा मजुरी करतो. २३ रोजी सायंकाळी साडे चार वाजता घरी आला आणि मजुरीचे पैसे मागू लागला. तुला मजुरीचे पैसे दिले आहेत असे रावसाहेब पाटील यांनी सांगताच देविदास शिवीगाळ करत निघून गेला. त्यानंतर साडेपाच वाजेच्या सुमारास रावसाहेब साकरे रस्त्यावर उभे असताना देविदास याने मागाहून येत रावसाहेबच्या कानावर व मानेवर चार पाच वेळेस ब्लेडने वार केले. त्यांच्या कानातून व मानेतून रक्त वाहू लागले. जवळच्या लोकांनी त्यांना तुळजाई हॉस्पिटल मध्ये दाखल केले तेथून ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. त्यांनतर त्यांना श्री ऍक्सिडंट हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. पोलिसांनी दवाखान्यात जाऊन जखमी रावसाहेबचा जबाब घेतल्यानन्तर अमळनेर पोलीस स्टेशनला देविदास विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल सुनील जाधव करीत आहेत.