मंत्री अनिल पाटलांच्या विशेष प्रयत्नांनी मंगळ ग्रह मंदिर परिसर विकासासाठी २५ कोटींचा निधी मंजूर

अमळनेर (प्रतिनिधी) मंत्री अनिल पाटलांच्या विशेष प्रयत्नांनी मंगळ ग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळदेव ग्रह मंदिराच्या परिसर विकासासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी मुंबई येथे २४ रोजी सह्याद्री विश्रामगृहात विशेष बैठक घेतली होती.

या निधी प्राप्तीसाठी मंत्री अनिल पाटील यांनी शासनाकडे मागणी पत्र दिले होते. सुरवातीला ७ फेब्रुवारी २०२३ रोजी उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर २७ जुलै २०२३ रोजी ग्रामविकास आणि पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांना २५ कोटींच्या प्रस्तावाबाबत पत्र दिले होते, त्यानंतरही मंत्री पाटील यांचा सतत पाठपुरावा सुरू होता. दरम्यान या पाठपुराव्यामुळे २५ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला काही महिन्यांपूर्वीच प्राथमिक मान्यता मिळाली होती. मात्र पाच कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी देण्याकरिता विशेष शिखर समितीची मंजुरी लागते. मंत्री पाटील यांच्या आग्रहामुळे त्या शिखर समितीची मुंबई येथे मुख्यमंत्र्यांनी विशेष बैठक बोलावली होती. त्यात हा निर्णय झाला. या बैठकीला शिखर समितीचे सदस्य मंत्री अनिल पाटील, मंत्री चंद्रकांत पाटील तसेच खासदार स्मिता वाघ याही उपस्थित होत्या. विशेष म्हणजे आठवडाभरातच याबाबत प्रशासकीय मान्यता व निविदा प्रक्रियेस प्रक्रिया होणार आहे. मंग्रलग्रह सेवा संस्थेसह सार्वजनिक बांधकाम विभाग , पर्यटन संचालनालय,  जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा नियोजन समिती यांनी देखील यासाठी प्रचंड मेहनत घेतली. या बैठकीत नियोजनाधिकारी विजय शिंदे, अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, कार्यकारी अभियंता प्रांजल पाटील, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी राहुरी येथे, मंगळ ग्रह सेवा संस्थेचे कन्स्ट्रक्शन कन्सल्टंट संजय पाटील उपस्थित होते. मंगळवारीच ही मान्यता मिळाल्याने आम्ही हा मंगळ ग्रह देवाचा प्रसाद मानतो असे संस्थेचे अध्यक्ष डीगंबर महाले यांनी म्हटले आहे.

 

या विकास कामांसाठी निधी 

 

या २५ कोटी रुपयांतून भाविकांसाठी भक्तनिवास बांधणे, प्रसादालय व भाविकांना बसण्यासाठी बैठक व्यवस्थेचे बांधकाम करणे, पूजा व अभिषेक झाल्यानंतर प्रसाद वाटपासाठी प्रसादालय बांधणे, गर्दी व्यवस्थापनासाठी सुरक्षा रक्षकांचे कार्यालय बांधणे, पर्यटन माहिती संग्रहालय इमारतीचे बांधकाम करणे, भाविकांसाठी श्री मंगळग्रह देव मंदिराची माहिती व संग्रहालय व्यवस्था करणे, परिसरात विविध इमारती व इतर ठिकाणी जोडण्यासाठी काँक्रीट रस्ते बांधणे, दुचाकी व चार चाकी वाहनांसाठी पार्किंग व्यवस्थेचे बांधकाम करणे, भाविकांसाठी मंडळ सभागृहचे ( आंफी थिएटर) बांधकाम करणे, परिसरात विद्युत पुरवठा व सोलर सुविधांसाठी तरतूद करणे, संपूर्ण परिसराला पाणीपुरवठा व मल निस्सारणाच्या सुविधांची बांधकामे करणे, संपूर्ण परिसरात उद्यान विकासाबरोबर विविध झाडे लावून पर्यावरण विकासासाठी विशेष कामे करणे, परिसरातील मोठया  नाल्याच्या समांतर काठावर भाविकांना बसण्यासाठी व परिसर विकासाची कामे करणे, गॅस लाईनचे बांधकाम करणे, पावसाच्या पाण्याचे जल पुनर्भरण करणे, अग्निशामक यंत्रणा उभारणे, दिव्यांगांसाठी रॅम्पची सुविधा करणे, नाल्यावर लोखंडी साकव वजा पूल बांधणे, मनोरंजनासाठी व बालकांसाठी उद्यानात खेळणी व साहित्य आणणे, इमारती व्यतिरिक्त भाविकांसाठी प्रसाधनगृहे बांधणे, पाणी पुरवठ्यासाठी भूमिगत पाण्याच्या टाक्या बांधणे व इतर अनुषंगिक बाबींचे बांधकाम करणे आदींचा समावेश  आहे.

 

मी दिलेला शब्द खरा ठरवला

 

मंगळ ग्रह सेवा संस्थेच्या विकास कामांच्या एका कार्यक्रमात जेव्हा संस्थेला फक्त पाच कोटी रुपये मिळाले होते. मी त्याच वेळी म्हटले होते की, संस्थेने २५ कोटी मागितले मात्र शासनाने पाचच कोटी दिले. मी जर सत्तेत आलो तर २५ कोटी आणल्याशिवाय राहणार नाही. मी दिलेला शब्द पूर्ण केला, याचा मला आनंद आहे.

अनिल पाटील, कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *