अमळनेर (प्रतिनिधी) पालिकेने स्वच्छ भारत सर्वेक्षण अंतर्गत शहरातील रस्ते स्वच्छतेसाठी खरेदी केलेले 34 लाख रुपयाचे स्वीपिंग मशीन तब्बल वर्षभरापासून धुळखात पडले आहे. पालिकेने ही धूळ झटकून मशीनचा वापर करावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून करण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या वर्षी अमळनेर नगर परिषदेने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शहराच्या स्वच्छतेसाठी स्वीपिंग मशीन, वाढीव कचरा संकलनासाठी घंटागाडी, फिरते शौचालय तसेच ट्रॅक्टर असे एकूण एक कोटी आठ लाख रुपये किमतीच्या आरोग्य सामग्रीची खरेदी करून 19 सप्टेंबर 2023 रोजी नगरपरिषदेने मंत्री अनिल पाटील, माजी आमदार, माजी नगरसेवक यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाच्या आवारात लोकार्पण सोहळा साजरा केला होता. मात्र शहरातील मुख्य रस्त्यांच्या दुभाजकालगत साचलेला कचरा व धूळ साफ करण्याकरिता पालिकेने घेतलेले 34 लाख रुपये किमतीचे स्वीपिंग मशीन वर्षभरापासून शहरातील रस्त्यांच्या स्वच्छतेसाठी वापर न केल्यामुळे आरोग्य विभागाच्या कार्यालयात धुळखात पडलेले आहे. गतवर्षी अमळनेर नगर परिषदेने स्वच्छ भारत अभियानात पालिकेचे अधिकारी व सफाई कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळे राज्यभर सहावा क्रमांक पटकावला होता. यावर्षी स्वच्छ भारत अभियानाच्या दुसऱ्या टप्प्या अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालयाने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता पंधरवडा अभियान साजरा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे यावर्षी तरी नगरपरिषदेने या अभियानांतर्गत शहरातील रस्त्यांच्या स्वच्छतेसाठी स्वीपिंग मशीनचा प्रत्यक्षात वापर करून स्वच्छता अभियानाला प्रारंभ करावा. तसेच शहराची स्वच्छता ही केवळ पंधरवडा न राहता ती कायमस्वरूपी राहावी. तसेच नगरपरिषद प्रशासनाने नागरिकांना स्वच्छता मोहिमेत सहभागी करून अमळनेरची मॉडेल शहर म्हणून ओळख निर्माण करावी.अशी अमळनेरकर नागरिक अपेक्षा व्यक्त करत आहेत.