मंगळ ग्रह मंदिरात शुभांक ” नऊ ” चा धार्मिक धमाका

अमळनेर ( प्रतिनिधी) येथील श्री मंगळदेव ग्रह मंदिरात नऊ फेब्रुवारी ला आगळ्या-वेगळ्या पद्धतीने ” नऊ ” चा धार्मिक धमाका होणार आहे.
नऊ हा श्री मंगळ ग्रहाचा शुभांक आहे . या पार्श्वभूमीवर नऊ फेब्रुवारी ला मंदिरासमोरील नियोजित पाच मजली भव्य इमारतीच्या तळ मजल्यावर नऊ कुंडी श्री गायत्री महायज्ञ होईल . या महायज्ञात ३६ जोडपे सहभागी होतील . ३६ या अंकातील तीन आणि सहाची बेरीज नऊ होते. ३६ जोडपे म्हणजे ७२ जण . ७२ या अंकातील सात आणि दोन ची बेरीज ही नऊ होते . शिवाय या महायज्ञास सकाळी आठ वाजून एक मिनिटांनी प्रारंभ होईल . यातही आठ अधिक एक ची बेरीज नऊ होते.
अशा रीतीने नऊ तारीख, नऊ कुंडी यज्ञ , ३६ जोडपे , ७२ जण व आठ वाजून एक मिनिटांचा मुहूर्त असा एकूणच नऊ या शुभांकाचा आगळा – वेगळा व प्रथमच धार्मिक धमाका होणार आहे .
विशेष म्हणजे याच सुमुहूर्तावर श्री मंगळ ग्रह मंदिराच्या प्रवेशद्वारा समोरील नियोजित पाच मजली इमारतीच्या ६५ × ११५ फुटी स्लॅबच्या कामासही प्रारंभ होणार आहे. या स्लॅबला एकही कॉलम नाही , हे विशेष . अद्ययावत पिटी स्लॅबच्या तंत्रज्ञानाचा यात वापर होणार आहे. स्टील डिझाइन दीर्घानुभवी ख्यातनाम अभियंता सतीश लाठी (जळगाव) यांचे आहे . अमळनेरचे वास्तू तज्ञ संजय पाटील यांची इमारत निर्माण कार्यात देखरेख असेल .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *