खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

‘आनंददायी शनिवार’ मुलांमध्ये वाढवतोय शिक्षणाची गोडी अन् गुणवत्ता

भगिनी मंडळाची आदर्श प्राथमिक शाळेत घेण्यात आला उपक्रम

 

अमळनेर (प्रतिनिधी) शिक्षण कंटाळवणे होऊ नये आणि शिक्षणाची गोडी वाढावी म्हणून शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने ‘आनंददायी शनिवार’ हा उपक्रम या शैक्षणिक वर्षात राज्यातील शाळेत राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार भगिनी मंडळाची आदर्श प्राथमिक शाळेत उपक्रम घेण्यात आला.

लहान वयातही विद्यार्थ्यांमध्ये ताण तणाव, उदासीनता नैराश्य आदी मानसिक विकारांचे प्रमाण वाढत चालले आहेत. यासाठी शालेय जीवनात आनंददायी कृती असण्याची गरज प्रकर्षाने जाणवू लागल्याने या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी वाढेल, विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यातून विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्तन व जबाबदारीबाबत जागरूकता निर्माण व्हावी, तसेच त्यांच्यात चांगल्या सवयी, सहकार्य, वृत्ती, नेतृत्व गुणांचा विकास व्हावा, पुढे चालून तर्कसंग विचार, कार्य करण्याची क्षमता, करुणा, सहानुभूती, साहस, लवचिकता, वैज्ञानिक चिंतन, रचनात्मक कल्पनाशक्ती, नैतिक मूल्ये आदि गुण रुजविण्याच्या अनुषंगाने ‘आनंददायी शनिवार’ हा 1ली ते 8वी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी राबविला जात आहे. तसेच या उपक्रमात प्राणायाम, योग, ध्यान धारणा, श्वसनांची तंत्रे, आपत्ती व्यवस्थापनाची मूलतत्त्वे व व्यावहारिक प्रशिक्षण. तसेच दैनंदिन जीवनातील वित्तीय व्यवस्थापन, स्वत:च्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी उपाययोजना, रस्ते सुरक्षा, समस्या निराकरणाची तंत्रे, कृती. खेळांवर आधारीत उपक्रम, नाते संबंध हाताळण्याचे कौशल्य आदि कृतींबरोबर इतर तत्सम प्रकारच्या नाविन्यपूर्ण कृतींचा समावेश करण्याची मुभा शाळांना देण्यात आली आहे.

भगिनी मंडळाची आदर्श प्राथमिक शाळेत ज्येष्ठ शिक्षिका विजया राजेंद्र गायकवाड , दिपाली पाटील, प्रियंका बाविस्कर विद्या पाटील, तृप्ती खैरनार, राजश्री पाटील, नीता पाटील आदी शिक्षिका प्रयत्न करीत आहेत.

 

भावनिक कौशल्य विकसितवर भर

 

विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राखणे, सामाजिक, भावनिक कौशल्य विकसित करणे, शालेय स्तरावर ताणतणावाचे व्यवस्थापन करून मुलांना सक्षम बनविणे, संभाषण कौशल्य विकसित करणे, आत्मविश्वास व नैराश्यवर मात करण्याची क्षमता निर्माण करणे, असे या उपक्रमाचे उद्देश आहेत.

 

विद्यार्थ्यांना आनंदी वातावरणाची अनुभूती

 

शासनाने १४ मार्चच्या परिपत्रकानुसार ‘आनंददायी शनिवार’ हा उपक्रम सुरु केला आहे. यात प्रत्येक शनिवारी विविध उपक्रमांच्या माध्यामातून विद्यार्थ्यांना आनंदी वातावरणाची अनुभूती करून द्यायची आहे. विद्यार्थ्यांच्या वर्तन आणि जबाबदारीबाबत जागरूकता निर्माण करता येईल. विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी, सहकार्य वृत्ती, नेतृत्व गुणांचा विकास होण्यास निश्चितच मला व माझ्या सर्व शिक्षक वृंदांना मदत होईल.

विजया राजेंद्र गायकवाड, उपक्रमशील शिक्षिका

 

शनिवारची आतुरतेने पाहतो वाट

 

‘आनंददायी शनिवार’ हा उपक्रम खरच आमच्यासाठी खूप आनंददायी आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवसापासून आम्ही सर्व विद्यार्थी शनिवारची आतुरतेने वाट पाहत असतो. कारण त्या दिवशी आम्हाला नवीन काही शिकण्यास मिळणार असल्याने त्याबाबत उत्सुकता असते. शनिवारी संपूर्ण शाळेत आनंददायी वातावरण असते.

मनस्वी संतोष सोनवणे, विद्यार्थिनी, इयत्ता- चौथी

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button