खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

बैल पोळ्याच्या बाजारपेठेत यंदा साहित्याच्या किमतीत 15% दरवाढीचा चढला साज

अमळनेर (प्रतिनिधी) बळीराजाच्या आयुष्यातील महत्त्वाचा पोळा सण अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपला आहे.त्यामुळे शेतकरी आपल्या लाडक्या सर्जा राजाचा साजशृंगार खरेदी करण्यासाठी सरसावला आहे. यामुळे तालुक्यातील मुख्य बाजार फुलला आहे. गतवर्षीच्या तुलनेत 10ते 15 टक्के साहित्याच्या दरात वाढ झाली आहे.

 यंदा सोमवारी बैल पोळा साजरा होत आहे. वर्षभर राबणाऱ्या बैलांसाठी लागणाऱ्या वस्तू खरेदीसाठी आठवडे बाजारात कष्टकरी, बळीराजाची गर्दी दिसून येत आहे. या सणासाठी लागणाऱ्या परंपरागत साहित्याला नावीन्यपूर्ण पद्धतीने तयार करण्यात आले आहे. मोरकी, नाथ, दोर, शिरडा, गेठा, गोंडे, पैंजण, शेंबी,शेंगेरू, नायलॉन, रेशम, येसेन, सुतावंडा,नारळ, कलर, आदी बैलांच्या सजावटीचे साहित्य खरेदी करण्यात येत आहे. पोळा सणाला मोरकी प्रामुख्याने खरेदी केली जाते. बैल पोळ्यासाठी बाजारपेठेत शिंगे झुली, श्रीरामाची प्रतिमा असलेल्या झुली, घुंगराची चंचाळ, नवीन रंगबेरंगी गोंडे, पितळी शेंबी, आदी साहित्याने बाजारपेठ सजली आहे. यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत 10 ते15 टक्के साहित्याच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खिशाला आर्थिक झळ बसत आहे. तरीही आपल्या शेतात वर्षभर राबणाऱ्या सर्जाराजासाठी शेतकऱ्यांची साहित्य खरेदीसाठी बाजारात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे.

 

पाऊस पाणी चांगला असल्याने शेतकऱ्यांकडून खरेदीला प्रतिसाद

 

सध्या दुकानांमध्ये साहित्य खरेदीसाठी शेतकरी राजांची लगबग सुरू आहे. यंदा पाऊस पाणी चांगला झाला आहे. त्यामुळे बैल पोळा सण उत्साहात साजरा होणार म्हणून आम्ही मोठ्या प्रमाणात दुकानात विक्रीसाठी साहित्य भरले आहे. सध्या शेतकरी मोठ्या आनंदाने साहित्य खरेदीसाठी दुकानात येत आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा साहित्यांच्या दरात  10 ते 15 टक्के दरवाढ झालेली आहे.

भिकचंद  जैन, व्यापारी 

 

सर्जा राजाचा सण दरवर्षी उत्साहात साजरा करणार

 

शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून वर्षभर राबणाऱ्या आमच्या सर्जा राजाचा सण दरवर्षी उत्साहात साजरा करतो. यावर्षी पावसाळा चांगला झाल्यामुळे शेत शिवार  देखील चांगले बहरलेले आहे. सर्जा राजासाठी यंदा विविध साज शृंगार खरेदी करत आहोत. तसेच प्रत्येक शेतकरी आपली बैलजोडी चांगल्या प्रकारे सजविण्यावर भर देत आहे.

मच्छिंद्र पाटील, शेतकरी, खडके 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button