अमळनेर (प्रतिनिधी) यंदा तालुक्यात आभाळ माया असल्याने निसर्डी लघु पाटबंधारे तलाव १०० टक्के भरून वाहू लागला आहे. यामुळे परिसरातील १० ते १२ गावांच्या २६७ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे. तलावात २.३२३० दशलक्ष घनमीटर पाणी साठा उपलब्ध झाला आहे.अमळनेर तालुक्यात यावर्षी आतापर्यंत ८८ टक्के पाऊस झाल्याने विहिरी आणि तलावांच्या भूजल पातळीत वाढ झाली आहे. माळीण नदीवर असलेल्या निसर्डी लघु पाटबंधारे तलाव ओसंडून वाहू लागला आहे. माळीण नदी यामुळे निसर्डी, लोंढवे, खडके , वाघोदे, पिंपळे खुर्द, पिंपळे बुद्रुक, चिमणपुरी, रणाईचे, ढेकू या गावांना सिंचनाचा तसेच बिगर सिंचन म्हणजे पिण्याच्या पाण्याचा फायदा होणार आहे. माळीण नदी वाहू लागल्याने गलवाडे, जैतपिर, धानोरा, बोरगाव, मारवड, डांगरी, बोहरा, जानवे, मंगरूळ, आनोरे, आर्डी या गावातील शेतशिवारात देखील फायदा होणार आहे. नदी जोड मोहीम राबवली गेल्यास बोरी काठावरील कन्हेरे, फापोरे पासून थेट डांगरी सात्रीपर्यंत फायदा होणार आहे. निसर्डी तलावात पाणी साचल्याने मासेमारी व्यवसायला चालना मिळणार आहे तर निसर्गाच्या सौंदर्यात भर पडून तरुण मुले पोहण्याचा आनंद घेत आहेत.