चौबारी ग्रामसभेत खडाजंगी; सोयीसुविधांची वानवा,ग्रामप्रशासनास धरले धारेवर…

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील चौबारी येथे मुलभूत सोयीसुविधांची वानवा असल्याकारणाने ग्रामस्थांनी ग्रामसभेत ग्रामप्रशासनास चांगलेच धारेवर धरले. 
विशेष म्हणजे चौबारीचा विकास खुंटल्याने मुलभूत सुविधांची पुर्तता होण्यासाठी गावाच्या इतिहासात प्रथमच भीमराव कैलास वानखेडे या तरुणाने ग्रामपंचायतीसमोर लाक्षणिक उपोषण केले.
नियमित ग्रामपंचायतीचा कर भरुनही सांडपाण्याची योग्य विल्हेवाट का लावली जात नाही असा जाब सखाराम पोपट पाटील या वृद्धाने ग्रामसभेच्या सुरुवातीलाच ग्रामसेवकास विचारला. शिवाय एकीकडे शासन हगणदारीमुक्तीसाठी प्रयत्न करत असताना गावात पूर्ण क्षमतेचे शौचालय निर्माण झालेले नाहीत,  तरीही कंत्राटदाराचे संगनमताने बिले काढण्यात आलेत. तसेच ग्रामपंचायतीमार्फत बांधण्यात आलेल्या शौचालयांचे काम निष्कृष्ट दर्जाचे असून तिथे पाण्याचा अभाव असल्याने ते अद्याप बंदच आहेत. संपूर्ण गावात सांडपाण्याची योग्य विल्हेवाट होत नसल्याने सोमनाथ नाल्यातच सांडपाणी व मैला जमा होत असतो. नाल्यालगतच वस्ती असल्याने डासांच्या उत्पत्तीमुळे रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गावाच्या चारही बाजुला काटेरी झुडपे व दलदल असुन कोणत्याही प्रकारची स्वच्छता मोहिम राबविली नाही. पिण्याच्या पाण्यात टीसीएल पावडरचा नियमित  वापर होत नसल्याचीही ओरड यावेळी करण्यात आली. या व्यतिरिक्त गावात व्यायाम शाळा बांधली असून त्यावर खाजगी कब्जा करण्यात आला आहे, मात्र ग्रामपंचायतीने अद्याप कोणतेच पाऊल उचलले नाही, २००५ मध्ये दलित वस्ती विकास योजनेअंतर्गत जि.प.तर्फे विहिरीचे बांधकाम करण्यात आले आहे, मात्र त्या विहिरीचा दलित बांधवांना अद्यापपर्यंत काहीच फायदा झाला नाही, वेळोवेळी याबाबत तक्रार करुनही ग्रामप्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही आदी अनेक कारणांनी तरुणांनी व वृद्धांनी ग्रामप्रशासनास जाब विचारला. मात्र ग्रा. पं. कराच्या वसुली शिवाय काहीही होऊ शकत नाही, असे ग्रामसेवक नितिन मराठे यांनी यावेळी सांगितले. 
यावेळी १४ व्या वित्त आयोगातून मिळालेल्या निधीचाही हिशोब विचारण्यात आला. मात्र मिळालेला निधी आणि करण्यात आलेला खर्च यात तफावत दिसून आल्याने ग्रामस्थांची नाराजी अजून वाढली. यावेळी सरलाबाई रविकांत पाटील यांनी पाणी फाउंडेशनमध्ये सर्व ग्रामस्थांनी गट-तट विसरुन हिरहिरीने सहभाग नोंदवावा आणि पाण्याची समस्या कायमस्वरुपी सोडवावी असे आवाहन केले. 

लेखी आश्वासनानंतर उपोषणाची सा
ंगता

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन गावात योग्य सुविधा मिळाव्यात म्हणून भीमराव वानखेडे हा तरुण गावातील काही सुज्ञ नागरीकांसोबत ग्रामपंचायत कार्यालयासमोर सकाळी ९ वाजेपासून लाक्षणिक उपोषणास बसला होता. गावाच्या इतिहासात उपोषणाची ही पहिलीच वेळ असल्याने या तरुणाने सर्व गावकºयांचे लक्ष वेधून घेतले होते. जो पर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही, तो पर्यंत उपोषणातून उठणार नाही असा आग्रह या तरुणाने धरला होता. शेवटी दुपारी २ वाजेच्या सुमारास ग्रामसेवक नितिन मराठे यांनी लेखी आश्वासन दिल्याने उपोषणाची सांगता झाली. 
यावेळी सरपंच मालुबाई यशवंत कढरे, माजी सरपंच मल्हारी पाटील, सदस्य गोकुळ पाटील, राजेंद्र पाटील, मधुकर   पाटील, माजी पोलीस पाटील सुधाकर पवार, विजय पाटील, रवींद्र कढरे, रावसाहेब पाटील, रविकांत पाटील, संजय पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *