अमळनेर (प्रतिनिधी) येथील साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयातील गणित शिक्षक डी. ए. धनगर यांनी विद्यार्थ्यांना गणिताविषयी जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी व गणितात चांगले यश मिळण्यासाठी मुख्याध्यापक सुनील पाटील व सचिव संदीप घोरपडे यांच्या मार्गदर्शनाने कृतीशील उपक्रम राबवला.
सर्वसाधारणपणे २२ जुलै पाय डे म्हणून साजरा केला जातो. त्यातच गणित शिक्षक धनगर सर वास्तव संख्या शिकवत असताना त्यांना परिमेय आणि अपरिमेय संख्या यांमधला फरक विद्यार्थ्यांना सांगत असताना गणितातील पाय या संख्येचे अद्भुत रहस्य सांगितले. कृतीशील पद्धतीने मुलांना प्रयोग करायला सांगितले. कोणत्याही वर्तुळाकार वस्तूचे मापन करून परिघ व व्यासाचे गुणोत्तर काढायला सांगितले. दोऱ्याच्या साह्याने विद्यार्थ्यांनीही त्यांची अचूक मापने घेऊन काढण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक विद्यार्थ्याला दहा वर्तुळाकार वस्तूंचा परीघ आणि व्यास यांचे गुणोत्तर काढण्याचे सांगितले. ते काढत असताना विद्यार्थ्यांच्या लक्षात आले की, आपण छोटी, मोठी कोणतीही वस्तू घेतली तरी परिघाचे व्यासाची असलेलं गुणोत्तर हे एक स्थिर संख्या येते. त्यामुळे विद्यार्थी अधिकाधिक वस्तू घेऊन त्याचा पडताळा घेऊ लागले. विद्यार्थ्यांची उत्कंठा जागृत झाली. यादरम्यान विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मापनाचा अनुभव आला , त्यासोबतच मूलांचे आकडेमोडीचे कौशल्य विकसित करण्यात मदत झाली. कारण गुणोत्तर काढताना प्रत्येक विद्यार्थी पाढे म्हणून भागाकार करू लागला. त्यामुळे शासनाला अभिप्रेत असलेली पायाभूत चाचणीतील कौशल्य विकसित झाले. विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती साध्य झाल्यामुळे शिक्षकांना व मुख्याध्यापक, संस्था चालक,पालक, विद्यार्थी सर्वांनाच समाधान वाटले. अशा या आनंददायी उपक्रमातून विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण तर मिळालेच सोबत नविन शैक्षणिक धोरणाची उद्दिष्ट साध्य करत , गणिताविषयी न्यनगंड सुद्धा दूर झाला व विद्यार्थी आवडीने गणिताकडे बघू लागले. उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे, मुख्याध्यापक सुनील पाटील, सर्व संचालक मंडळ व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे व उपक्रमशील शिक्षकांचे कौतुक केले.