ताप, सर्दी, खोकला, हगवण सारखे आजार बळावले
अमळनेर (प्रतिनिधी) सततच्या पावसामुळे अमळनेर शहराची हवा बिघडल्याने नागरिकांचे आरोग्यही बिघडले आहे. दूषित पाणी आणि हवा यामुळे अनेक नागरिकांना ताप ,सर्दी ,खोकला , हगवण यासारखे आजार होऊ लागल्याने दवाखान्यात गर्दी वाढली आहे.
अमळनेर शहरासह तालुक्यात गेले सात आठ दिवस सतत पाऊस पडला. अमळनेर तालुक्यात आतापर्यंत सव्वा महिन्यात ३७२ मिमी पाऊस म्हणजे वार्षिक पावसाच्या ५५ टक्के पाऊस पडून गेला आहे. शहरात अनेक रिकाम्या प्लॉट , खुले भूखंडात पाण्याचे डबके साचल्याने डास ,मच्छर ,माशा , कीटक यांची पैदास वाढली आहे. तसेच तापी नदीलाही हतनूर धरणाचे पाणी सोडले असल्याने व काही ठिकाणी पाईप लाईन लिकेज मुळे गढूळ पाणी येते. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहेत.
वातावरण बदलामुळे आरोग्यावर परिणाम
ग्रामीण रुग्णालयात ताप ,सर्दी ,खोकला असे साधारणतः २०० रुग्ण येत आहेत. पावसाळ्यात वातावरण बदलामुळे आरोग्यावर परिणाम होतातच.
– डॉ प्रकाश ताळे , ग्रामीण रुग्णालय, अमळनेर
नागरिकांनी खाण्यावर नियंत्रण ठेवावे
दूषित पाणी, हवामान किंवा व्हायरल विषाणूमुळे नागरिकांचे आरोग्य बिघडत आहे. मात्र दोन दिवसात बरे देखील होत आहेत. पावसाच्या वातावरणात नागरिकांनी खाण्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे.
– डॉ. उमेश सोनवणे , अमळनेर
कीटक नाशक तण नाशक फवारणी
रस्त्यावर तसेच पालिकेच्या खुल्या भूखंडात कीटक नाशक तण नाशक फवारणी व स्वच्छता सुरू आहे. मात्र नागरिकांच्या खाजगी प्लॉट मधील घाणीची ,कचऱ्याची साफसफाई झाली पाहिजे.
– तुषार नेरकर , मुख्याधिकारी ,नगरपरिषद ,अमळनेर