कामगार संघटनांचे पालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
अमळनेर (प्रतिनिधी) येथील अखिल महाराष्ट्र , कामगार कर्मचारी संघ, अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस, नगरपालिका कामगार युनियन शाखा अमळनेर यांच्यातर्फे पालिका मुख्याधिकारी यांना हाय कोर्टाच्या निर्णयान्वये अनुसूचित जातीच्या सफाई कामगारांना वारसा हक्काने नियुक्ती देण्याबाबत निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार 1974 पासून वारसा हक्क कायदा लागू आहे. या कायद्यानुसार नगर परिषदेतील अनुसूचित जातीच्या सफाई कामगारांना वारसा हक्क लागू होता व लागू आहे. मध्यंतरीच्या काळात या कायद्यानुसार केवळ अनुसूचित जातीतील मेहतर , वाल्मीक, भंगी, यांनाच वारसा हक्काच्या सवलती चालू होत्या. परंतु अनुसूचित जातीतील इतर पोट जातींना उदा. महार,बौद्ध मातंग यांना वारसा हक्काच्या सवलती दिल्या नव्हत्या. म्हणून दिनांक १० एप्रिल २०२३ पासून वारसा हक्काच्या नेमणूकीपासून वरील पोट जाती सफाई कामगार जे वंचित राहिले होते त्यांना न्याय मिळावा म्हणून हायकोर्टात अपील दाखल करण्यात आली होती. त्या अपीलाचा निर्णय लागून दिनांक २४/६/२०२४ पासून न्यायालयाने इतर पोट जातींनाही उदा. महार ,मातंग व नवबौद्ध यांना वारसा हक्काने सफाई कामगार म्हणून नोकरीचा लाभ देण्याचे आदेशित करण्यात आले आहे. या आदेशाची अंमलबजावणी होण्यासाठी अखिल महाराष्ट्र ,कामगार कर्मचारी संघ , अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस, नगरपालिका कामगार युनियन शाखा अमळनेर यांनी अमळनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन दिले. सदरचे निवेदन स्वीकारण्यासाठी उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड उपस्थित होते. या निवेदनावर मुकेश आत्मारामबिऱ्हाडे , नवल न्हानकू बि-हाडे, रूपचंद पारे, रघुनाथ मोरे ,गिताबाई खरारे, नंदलाल तेजी, बिंदूकुमार सोनवणे, विकास जाधव, रा . रा. पवार, विनोद जाधव यांच्या स्वाक्षऱ्या होत्या.