जीवनात जन्मभूमी, आई-वडील, गुरुवर्य हेच खरे प्रेरणास्त्रोत ः संदीपकुमार साळुंखे

मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना दप्तर वाटप

 

अमळनेर (प्रतिनिधी) मी तुमच्यासारखाच येथील मातीतील सुपुत्र आहे. मलाही विद्यार्थी दशेत दप्तरातूनच प्रेरणा मिळाली. हे दप्तर तुम्हाला नक्कीच अपेक्षित ध्येयाकडे नेण्यासाठी उपयोगी ठरेल. त्यामुळे दप्तराला नेटकेपणाने जपा. जीवनात जन्मभूमी, आई-वडील, गुरुवर्य हेच खरे प्रेरणास्त्रोत असल्याने त्यांच्याप्रती सदैव कृतज्ञता राखा, असे आवाहन आयकर आयुक्त संदीपकुमार साळुंखे यांनी केले.

मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही ६ जुलैस मंगळ ग्रह मंदिराच्या हॉलमध्ये विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अमळनेर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाळकर, प्रांताधिकारी महादेव खेडकर, तहसीलदार रूपेशकुमार सुराणा, पोलीस निरीक्षक विकास देवरे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर, जळगाव जिल्हा वन विभागाचे अधिकारी ए प्रवीण, मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, आमोदे (ता. अमळनेर) येथील सरपंच रजनी पाटील, व्ही. एन. पाटील आर्मी स्कूलचे सुभेदार मेजर नगराज पाटील, उपशिक्षक उमेश काटे,  विविध शाळांचे शिक्षक-शिक्षिका तसेच मंगल सेवेकरी प्रकाश मेखा, विनोद कदम, पुषंद ढाके, जे. व्ही. बाविस्कर आदी उपस्थित होते.

आयुष प्रसाद म्हणाले, की सध्याच्या स्पर्धेच्या युगात उत्तुंग यश मिळवणाऱ्यांमध्ये मुलांपेक्षा मुली आघाडीवर आहेत. मात्र मुलांनी गुन्हेगारी क्षेत्रात उच्चांक गाठल्याचे दिसते, हे थांबायला हवे. अमळनेर हे अनेकार्थाने लौकिकप्राप्त शहर असून प्रत्येक स्पर्धा परीक्षेच्या निकालात अमळनेरचे विद्यार्थी उच्च पातळीवर असतात. संदीपकुमार साळुंखे हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. मंगळ ग्रह सेवा संस्था नेहमीच विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत असल्याने मला त्याचा विशेष अभिमान आहे. तुम्हीही या दप्तररूपी आशीर्वादाची शिदोरी गाठीशी ठेवून उज्ज्वल यश संपादन करा.

तत्पूर्वी, डॉ. महाले यांनी मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध समाजोपयोगी उपक्रमांचा ऊहापोह केला. कार्यक्रम यशस्वितेसाठी मंदिराच्या सेवेकर्‍यांनी परिश्रम घेतले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *