खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

गृहोपयोगी वस्तू संच वाटपाचा सावळा गोंधळ अजूनही सुरू असल्याने कामगारांचे हाल

अमळनेर तालुक्यातील कामगारांना गृहोपयोगी वस्तू संच घेण्यासाठी भडगावला जावे लागणार

 

अमळनेर (प्रतिनिधी) कामगारांना गृहोपयोगी वस्तू संच वाटपाचा सावळा गोंधळ अजूनही सुरू असून ठेकेदार म्हणतो भडगावला यावे लागेल तर कामगार कल्याणकारी मंडळाचे अधिकारी म्हणतात अमळनेर तालुका चाळीसगाव केंद्राला जोडलेला आहे, म्हणून तेथे कामगारांना पाठवा, असे सांगत आहेत. त्यामुळे त्यामुळे कामगारांना रोजगार बुडवून आणि आर्थिक भुर्दंड सोसून गृहोपयोगी वस्तू संच घेण्यासाठी हेलपाटे मरावे लागणार आहेत. लोकप्रतिनिधी यांच्या  उदासीन भूमिकेमुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  बांधकाम क्षेत्रातील कामगार स्वतःच्या घरापासून दूर काम करण्यासाठी जात असतात. त्या कामगारांच्या सुरक्षेतेसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली आहे.या मंडळाच्या माध्यमातून नोंदणीकृत पुरुष व महिला कामगारांना सुरक्षा साधनांसह, संसारोपयोगी साहित्य देखील वाटप करण्यात येते. मात्र या कामगार कल्याणकारी मंडळाचे जिल्हास्तरावरून गृहोपयोगी वस्तू संच (किचन सेट) वितरित करण्याचे नियोजन ढासळले होते. मग त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी तालुकास्तरावर वितरण करण्याचे नियोजन करण्याबाबत आदेश दिलेत. त्या अनुषंगाने जिल्हा पुरवठादार संस्थेने 5 मार्च रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात नियोजन केले होते. परंतु तेथेही पुरवठादाराच्या नियोजनाच्या अभावाने रोजगार बुडवून आलेल्या कामगारांना फक्त मंडळाच्या पावतीवर गृहोपयोगी संच मिळाले. असे शिक्के मारून बिना संच घेता घरी परतावे लागले होते. त्यानंतर लगेच लोकसभेची आचारसंहिता  लागल्यामुळे पुरवठादाराकडून गृहोपयोगी संच वाटप बंद करण्यात आले होते. पण आता आचारसंहिता संपून देखील बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे अधिकारी गृहोपयोगी वस्तुसंच देण्याचा ठेका राज्यस्तरीय असल्याचे सांगून तसेच मंडळ फक्त कामगारांची नोंदणी करून त्यांना नोंदणीकार्ड वाटप करत असते. तसेच अमळनेर तालुका चाळीसगाव केंद्राला जोडलेला आहे. आपण तेथे कामगारांना पाठवा. असे सांगून सहाय्यक कामगार आयुक्त आपली जबाबदारी झटकत आहेत. हे विशेष! दुसरीकडे पुरवठादार शेख फैयाज हे अमळनेर तालुका भडगाव केंद्राला जोडले असल्याचे सांगतात. त्यामुळे मंडळाचे अधिकारी व जिल्ह्याचे पुरवठादार यांच्यात समन्वय नसल्याकारणाने तालुक्यातील कामगारांना गृहोपयोगी वस्तुसंच घेण्यासाठी पुरवठादारातर्फे भडगावला येण्याचे भ्रमणध्वनीद्वारे कळविण्यात येत आहे. त्यामुळे कामगारांना आता रोजगार बुडवून तसेच स्वतः भाडे खर्च करून भडगावला जावे लागत असल्याकारणाने स्थानिक लोकप्रतिनिधीनी या विषयाकडे लक्ष देऊन तालुकास्तरावर वाटप करण्याचे नियोजन करण्याची मागणी कामगार वर्गाकडून होत आहे.

 

कामगार भडगावला येऊन घेताय किचन सेट

 

अमळनेर तालुक्यात 1 फेब्रुवारीपासून आजपावेतो साधारण 3000 कामगारांची नोंदणी झालेली असून त्यापैकी 1700 कामगारांना किचन सेटचे वाटप झाले आहे. उरलेल्या 1300 पैकी रोज 50 ते 100 कामगार स्वतः भडगावला येऊन किचन सेट घेऊन जात आहेत.

शेख फैयाज, जिल्हा पुरवठादार

 

कामगारांना चाळीसगावला पाठवा

 

वस्तू पुरवठा ठेका राज्यस्तरीय असून जिल्ह्याचा उपठेका कोणाला दिलेला आहे. याची कल्पना नाही. जिल्ह्यात वस्तू वाटपासाठी जळगाव व चाळीसगाव ही केंद्र केली असून अमळनेर तालुका चाळीसगावला जोडला असल्याने कामगारांना चाळीसगावला पाठवा. किती लाभार्थ्यांना वाटप बाकी आहे. याची माहिती घेऊन सांगतो.

चंद्रकांत बिरार, प्रभारी सहाय्यक कामगार आयुक्त, जळगाव 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button