खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

अमळनेर येथे मोफत रोजगार प्रशिक्षण मेळावा, प्राथमिक चाचणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

मंगळग्रह सेवा संस्था व मल्टी मीडिया फीचर्स प्रा.लि.चा युवकांसाठी विधायक उपक्रम

 

अमळनेर (प्रतिनिधी) येथील मंगळ ग्रह सेवा संस्था व मल्टी मीडिया फीचर्स प्रा. लि., जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात ३ जुलै रोजी खानदेशस्तरीय एकदिवसीय मोफत खानदेश रोजगार प्रशिक्षण मेळावा व प्राथमिक चाचणी शिबिर झाले. त्यास युवा-युवतींसह नव्याने उद्योग तथा व्यवसायाची कवाडे उघडू पाहणाऱ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला. या मेळाव्यात खानदेशातील जळगाव, धुळे व नंदुरबार या जिल्ह्यांतीलही काहींनी सहभाग नोंदविला.

रोजगार मेळाव्यातील प्रथम सत्रात सुप्रसिद्ध कॉर्पोरेट ट्रेनर गोपी गिलबिले व अनिता गिलबिले या दाम्पत्याने नोकरी मिळविण्यासह उद्योग तथा व्यवसायाची नेटकेपणाने उभारणी करण्यासाठी उमेदवारांना कोणकोणती कौशल्ये अवगत असणे आवश्यक आहे? आयुष्यात शिक्षणाचे महत्त्व किती आहे? नोकरी कशी मिळवायची? नोकरी मिळाल्यावर ती कशी टिकवायची? प्रत्येक क्षेत्रात महिलांचे वाढलेले योगदान याबाबत वेळोवेळी उदाहरणे देऊन सविस्तर मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात जळगावातील जैन उद्योग समूहाचे सीएसआर मॅनेजर गिरीश कुलकर्णी यांनी उपस्थितांना मुलाखत तंत्राविषयी सखोल मार्गदर्शन केले. ‘मॉक इंटरव्यूव्ह’च्या माध्यमातून मुलाखतीदरम्यान होणाऱ्या चुका कशा टाळाव्यात याविषयीही मार्गदर्शन केले. मल्टी मीडिया फीचर्स प्रा.लि.चे संस्थापक तथा सीईओ सुशील नवाल यांनीही या मुलाखतीदरम्यान होणाऱ्या चुका लक्षात आणून देल्या. त्या कशा टाळता येतील याबाबत मार्गदर्शन केले. तत्पूर्वी, मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले व सुशील नवाल यांनी खानदेश रोजगार महामेळावा आयोजित करण्यामागील भूमिका विशद केली. मंगळ ग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एन. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, मंगल सेवेकरी प्रकाश मेखा, आर. टी. पाटील, पुषंद ढाके आदी यावेळी उपस्थित होते. भरत पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश मेखा यांनी आभार मानले. मेळाव्यात सर्व सहभागींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. मेळावा यशस्वितेसाठी मंगळ ग्रह सेवा संस्थेचे सेवेकरी तसेच मल्टी मीडिया फीचर्स प्रा.लि.च्या टीमचे सहकार्य लाभले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button