अमळनेर (प्रतिनिधी) पोलिस भरतीसाठी धावत असतानाच अचानक कोसळल्याने रुग्णालयात नेल्यावर तेथे पुन्हा ह्रदयविकाराचा झटका आल्याने अमळनेर येथील होतकरू तरुणाचा मुंबईत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २९ जून रोजी घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर येथील प्रबुद्ध कॉलनीतील रहिवासी अक्षय मिलिंद बिऱ्हाडे (वय २२) हा तरुण मुंबईत बाडेगाव येथे पोलीस भरतीसाठी गेला होता. सुरुवातीला मैदानी चाचणी साठी ५ कीमी धावावे लागणार असल्याने तो मैदानात उतरला आणि मोठ्या जिद्दीने धावू लागला. मात्र साडेचार किमी अंतर धावल्यानंतर केवळ ५०० मीटर बाकी असताना अचानक तो खाली कोसळून बेशुद्ध झाल्याने त्याला तातडीने उचलून कळवा येथे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. दोन तासांनी तो शुद्धीवर ही येऊन त्याला बरेही वाटू लागले. मात्र पुन्हा घात होऊन त्याला हृदयाचा जोरदार झटका आल्याने त्याची प्राणज्योत मालवली. या दुःखद घटनेने त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून आईवडिलांचा एकुलता एक आधार हिरावून नेला आहे. वडील आजारी आणि बहिणीचे लग्न झालेले आणि अक्षय हा एकटा होता. त्यामुळे गेल्या गेल्या अनेक वर्षांपासून पोलिसांत भरती होण्याचे स्वप्न पाहुन प्रचंड मेहनत तो घेत होता. या वेळी भरती होणारच अशी जिद्द त्याची होती. मात्र दुर्देवाने स्वप्न अधुरे सोडून तोच जीवानिशी गेल्याने अमळनेर येथे सर्वत्र दुःख व्यक्त होत आहे. त्याचे मुंबईत शवविच्छेदन करून सकाळी मृतदेह अमळनेर येथे आणण्यात येणार आहे. त्याच्या पश्यात आईवडील, एक बहीण, काका असा परिवार असून मिलिंद बिऱ्हाडे यांचा तो मुलगा तर नगरपालिका अग्निशमन विभागाचे फायरमन दिनेश बिऱ्हाडे यांचा तो पुतण्या होता.