जून महिन्याच्या २१ दिवसातच ३० टक्के पाऊस पडल्याने नदी, नाले विहिरींना पाणी
अमळनेर (प्रतिनिधी) गेल्या वर्षी जून महिन्यात पाऊसच पडला नव्हता. दुष्काळ आणि टंचाईचा सामना अमळनेर तालुक्याला करावा लागला होता. मात्र यंदा आभाळमाया राहिली आहे. जून महिना आटोपत नाही तोवर अमळनेर तालुक्यात पावसाने २०० मिमीचा आकडा पार केला आहे. २८ जून पर्यंतच्या पावसाने २३२.३९ मिमी पर्यंत नोंद केली आहे. त्यामुळे यंदा आबादणी राहणार आहे.
सरासरी सात जूनला पावसाळा सुरू होतो. अमळनेर तालुक्यात जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत तरी पाऊस काही प्रमाणात पडतो. मागील वर्षी जून २०२३ मध्ये संपूर्ण जून महिना उलटला होता. तरी पाऊस पडला नव्हता. काहींची पेरणी झाली नव्हती तर काहींना दुबार पेरणी करावी लागली होती. त्या तुलनेत यावर्षी मात्र ७ जून पासूनच पावसाळा सुरू झाला आहे. हवामान खात्याने देखील पुरेसा पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवल्याने यावर्षी शेतकऱ्यांनी कपाशी ,मका ,ज्वारी ,उडीद ,मूग या पिकांची लागवड केली आहे. तालुक्यात सर्वत्र पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. १७ जून , २७ जून ,२८ जून रोजी जोरदार पाऊस झाला आहे. लोंढवे , खडके ,वाघोदे ,शिरूड ,जानवे ,निसर्डी , जवखेडा ,आंचलवाडी या गावात तर अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाल्याने शेतातील माती, ठिबक नळ्या, पिके वाहून अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. जवळपास ९० ते ९५ टक्के शेतकऱ्यांच्या पेरण्या झाल्या आहेत. मात्र दमदार पावसामुळे विहिरी, नदी, नाल्याना पाणी आल्याने भूजल पातळीत वाढ होण्यास चांगली मदत झाली आहे. गेल्यावर्षी ३० ते ३२ गावाना टँकर ने पाणी पुरवठा करावा लागला होता. यावर्षी निश्चितच टंचाईवर मात होणार आहे. अतिवृष्टीने जरी शेतकऱ्यांचे नुकसान झाले असले तरी कोरड्या दुष्काळपेक्षा ओला दुष्काळ परवडला. किमान खरीप पीक जरी घेता आले नाही अथवा उत्पनाचे नुकसान झाले तरी रब्बी पीक चांगले येते म्हणून शेतकऱ्यांना आनंद झाला आहे.
मंडळनिहाय पडलेला पाऊस
अमळनेर मंडळ ५४ मिमी , शिरूड ८ मिमी , पातोंडा ४७ मिमी, मारवड ५७ मिमी, नगाव ५० मिमी, अमळगाव ४० मिमी , भरवस ४२ मिमी ,वावडे ४५ मिमी पाऊस झाला आहे. सरासरी ४२.८८ मिमी पाऊस तर एकूण २३२.३९ मिमी पाऊस झाला आहे.