कामगार आयुक्त विजय निंबा चौधरी यांच्या सहकार्याने राबवला उपक्रम
अमळनेर (प्रतिनिधी) कामगार आयुक्तांच्या मदतीने माळण नदीचे खोलीकरण करण्यात आल्याने पहिल्याच पावसात जलसाठा झाला आहे. त्यामुळे चिमणपुरी पिंपळे येथील गुरढोरांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न हा काही प्रमाणात का असेना पण आज रोजी सुटल्यासारखा आहे.
चिमणपुरी पिंपळे गावाचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लावण्यासाठी तसेच शेतीसाठी सिंचन करुन जमीनीच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी माळण नदीचे खोलीकरण करणे काम हे कामगार आयुक्त विजय निंबा चौधरी यांनी स्वतः आपल्या गावात पाण्याचा प्रश्न बिकट असल्याकारणाने टँकर मुक्त गाव कसं होईल व काय उपाययोजना करावा लागतील, याबाबत त्यांनी सरपंच ग्रामसेवकाला विचारले होते. माझ्या कडून काही मदत लागल्यास मी केव्हाही गावासाठी मदत करण्यास तयार आहे, असे सांगितले होते. त्यानुसार माळण नदी खोलीकरणासाठी स्वखर्चाने नदीचे खोलीकरण करण्यात आले व पहिल्याच पावसात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. यामुळे गुरढोरांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न हा काही प्रमाणात का असेना पण आज रोजी सुटल्यासारखा आहे. लोकनियुक्त सरपंच वर्षा युवराज पाटील व सामाजिक कार्यकर्ता युवराज पाटील, पुरुषोत्तम लोटन चौधरी यांच्या सहकार्याने नदी खोलीकरणाचे काम कामगार आयुक्त विजय निंबा चौधरी यांच्या सहकार्याने केल्याबद्दल सर्व ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक केले आहे.