अमळनेर (प्रतिनिधी) शेतशिवारातील विजेच्या खांबांवरील साडे आठ हजार रुपयांच्या विद्युत तारा चोरट्याने चोरून नेल्याची घटना तालुक्यातील कुऱ्हे बुद्रुक येथील गट क्रमांक ४९ व ५० मध्ये ८ जून रोजी घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कुऱ्हे बुद्रुक शिवारातील महेंद्र सुभाष पाटील, मनोज अशोक पाटील, मनीषा भावे, धनसिंग पाटील, राजेंद्र पाटील, सुरेश पाटील यांच्या शेतातील गट क्रमांक ४९ व ५० मधील सात गाळ्यातील विजेच्या खांबांवरील तीन फेज व एक न्यूट्रल अशा १ हजार ६८० मीटर तारा चोरीस गेल्याची माहिती महेंद्र पाटील यांनी कळवल्यावर अभियंता विवेक सावंत व महेंद्र चव्हाण यांनी पाहणी केली. सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला भारतीय विद्युत कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल लक्ष्मीकांत शिंपी करीत आहेत.