अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील हिंगोणे खु. येथे बिबट्यांनी पशुधनावर जोरदार हल्ला करत जखमी केल्याची घटना तालुक्यातील दि 9 च्या रात्री घडली. या घटनेत 4 ते 5 बिबटे असण्याचा अंदाज असून 3 ते 4 जनावरे जखमी झाली आहेत, तर बिबट्यांनी एक म्हशीचे पारडू खाऊन केले फस्त केले आहे. या गावाच्या शिवारात वेगवेगळ्या शेतात या घटना घडल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की तालुक्यातील ग्रामीण भागात बिबट्याचा वावर वाढत चालल्याचे चित्र आहे. या हल्ल्यात गंगाधर दगाजी पाटील,दगाजी माधवराव पाटील व समाधान कोळी यांची जनावरे जखमी झाली आहेत. या घटनेने हिंगोणे खुर्द सह परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना सकाळी उघडकीस आल्यानंतर वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गावात व घटनास्थळी भेट देऊन माहिती जाणून घेतली तसेच बिबट्यांच्या पायाचे ठसे देखील त्यांनी घेतले.सदर हल्ला करणारे प्राणी बिबटेच असण्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे,मात्र ते किती असावेत याचा अंदाज ते वर्तवू शकलेले नाहीत. मात्र ग्रामस्थ व शेतकरी बांधवानी घाबरून न जाता रात्रीच्या वेळी शेतात जाणे टाळा,दिवसा देखील एकट्याने जाऊ नका,आपली जनावरे बंदिस्त ठिकाणी बांधा बिबट्या कुठेही दिसल्यास जोरदार आवाज करा अश्या सूचना त्यांनी केल्या आहेत.