उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी मान्सूनपूर्व आढावा बैठकीत अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना
अमळनेर (प्रतिनिधी) मान्सूनच्या वेळी नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी वेळेपूर्वीच सर्व यंत्रणा सतर्क ठेवा. आवश्यक त्या यंत्रणा दुरुस्त करून घ्या, संपर्क तात्काळ होण्याचे नियोजन करा, अशा सूचना उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी मान्सूनपूर्व आढावा बैठकीत अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या.
लवकरच पावसाळा सुरू होणार आहे. यावेळी म्हणजे वादळी पाऊस, विजा, पूर यामुळे नैसर्गिक आपत्ती ओढवते. त्यात वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकारही वाढतात. त्यामुळे महावितरणने विजेच्या ताराना झाडे व त्यांच्या फांद्या नडत असतील तर ते काढून घ्या, नाले खोलीकरण सफाई करून घ्या जेणेकरून पाण्याचे प्रवाह रोखून पाणी तुंबणार नाही. नदी काठावरील अतिक्रमण आणि नागरिकांना सूचना द्या, स्थलांतर करून घ्या , आरोग्य यंत्रणा ,पोलिस यंत्रणा ,गावात दवंडी सूचना देता येतील यासाठी संपर्क क्रमांक घेऊन अपडेट करून घ्या. धोक्याचे ,पुराचे , वादळाचे ,अतिवृष्टीच्या पूर्वी सूचना इशारे दिल्या गेल्या पाहिजेत. जुन्या ,जीर्ण इमारती खाली करून घ्या , नगरपालिका, ग्रामपंचायतींनी घरमालकाना नोटिसा द्याव्यात, गावांचे संपर्क बंद होणार नाहीत यासाठी आवश्यक ती काळजी व पर्याय शोधून ठेवा. दैनंदिन जीवनात अडथळे निर्माण होऊन जीवित व वित्त हानी होणार नाही यासाठी प्रत्येक विभागाची जबाबदारी आहे अशा सूचना आढावा बैठकीत देण्यात आल्या. या बैठकीस तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, डीवायएसपी सुनील नंदवाळकर, महावितरणचे कार्यकारी अभियंता तुषार नेमाडे , बांधकाम खात्याने उपविभागीय अभियंता हेमंत महाजन, निम्न तापी प्रकल्पाचे जितेंद्र याज्ञीक, मुख्याधिकारी तुषार नेरकर , पोलीस निरीक्षक विकास देवरे, विद्युत अभियंता हेमंत सैंदाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक, विस्तार अधिकारी एस. एस. कठळे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे डी. आर. पाटील, आरोग्य विभागाचे टी. एस. पाटील , ए.आर. कोठावदे उपस्थित होते.