पोलिसांनी दोन दिवसात सात जनावरे दोन वाहनांसह साडे पाच लाखाचा मुद्देमाल केला जप्त

अमळनेर  (प्रतिनिधी) जनावरांची कत्तल थांबवण्यासाठी पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी आठवडा भरात पाच सहा कारवाया केल्या आहेत. गेल्या दोन दिवसात दोन वाहनांवर कारवाया करून सात जनावरे व दोन वाहने असा एकूण पाच लाख ३१ हजार रुपयांचा  मुद्देमाल जप्त करून गुन्हे दाखल केले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की,  आगामी बकरी ईद सणाच्या  निमित्ताने गोवंश व इतर जनावरांची बेकायदेशीर वाहतूक होऊन त्यांचा कत्तलीसाठी वापर केला जाऊ शकतो म्हणून पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी विशेष पोलिसांची नियुक्ती करून निर्दयीपणे जनावरांची वाहतूक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. २९ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास  डीवायएसपी नंदवाळकर याना  मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सहा पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कोठावदे , सुनील पाटील ,सचिन पाटील यांनी पैलाड पोलीस चौकीजवळ सापळा रचला असता त्यांना वाहन (क्रमांक एम एच १२ क्यू जी ९४९८) वाहनात दोन गायी व दोन म्हशीचे पारडू निर्दयीपणे कोंबून आणत असल्याचे आढळून आले. वाहन चालकाकडे गुरे वाहतूक करण्याचा परवाना नव्हता. चालकाला पोलिसांनी नाव विचारले असता त्याने त्याचे नाव हिमालय गोरख धनगर (रा. कठोरा ता चोपडा हल्ली मुक्काम पैलाड अमळनेर) असे सांगितले तर त्याच्या सोबत गाडीत असलेल्या इसमाचे नाव फराज खान हमीद खान (रा. बुद्ध विहार फरशी रोड) असे सांगितले.  दोघांनी ही गुरे कठोरा ता चोपडा येथून आणत  असल्याचे सांगितले. पोलिसांनी ४६ हजार रुपये किमतीचे  दोन गायी, दोन पारडू तसेच १ लाख २० हजार रुपयांचे वाहन असा १ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सचिन पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  तसेच २८ रोजी सकाळी ४ वाजता चोपड्याकडून धरणगाव कडे एक वाहन (क्रमांक एम एच २० इ एल ४३२८ ) मध्ये गुरे कोंबून जात असल्याची माहिती मिळल्यावरून योगेश बागुल व विजय भोई या पोलिसांना मिळल्यावरून त्यांनी सावखेडा गावाजवळ कुसुमाई पेट्रोलपम्प जवळ वाहन अडवून चौकशी केली असता तीन गायीचे पाय बांधून त्यांना दाटीवाटीने कोंबून चारा पाणी न देता वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी चालक व क्लीनर ला  नाव विचारले असता त्याने त्याचे नाव गोपाळ गोविंद मंडावत (वय ३० बालाजी नगर सिल्लोड जि छत्रपती संभाजीनगर) व साईनाथ मगन कानडजे (वय ३२ रा डोंगरगाव ता. सिल्लोड) अशी सांगितली व ही गुर सनावद जिल्हा बडवाणी मध्यप्रदेश येथून आणत असल्याचे सांगितले. पोलिसांनी ६५ हजार रुपये किमतीच्या तिन्ही गायी व ३ लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण ३ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोघा आरोपींविरुद्ध प्राण्यांची क्रूरतेची वागणूक प्रतिबंधक कायदा १९६० च्या कलम ११(१)(ड)( ई )(फ )(क) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून तपास हेडकॉन्स्टेबल सुनील जाधव करीत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *