अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर येथे रस्त्यावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्यभरात रस्ता सुरक्षा अभियानाची सुरुवात शहरात बस स्थानक परिसरात करण्यात आली आहे.
या मोहिमेचा शुभारंभ माजी जिल्हा परिषद सदस्य संदीप पाटील , माजी नगरसेवक संजय पाटील, जीवन पवार, पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर, टॅक्सी युनियनचे अध्यक्ष बंडू केळकर, रिक्षा युनियनचे संजय महाजन, पारोळा टॅक्सी युनियन चे अध्यक्ष संजय पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी बोलतांना पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी वाहतुकीची माहिती दिली त्यात आता रस्ता सुरक्षेचे महत्त्व लोकांना कळावे यासाठी राज्यभर रस्ता सुरक्षा अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. केवळ वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी करणे हा या मोहिमेचा उद्देश न ठेवता समाजप्रबोधनातून रस्ता सुरक्षेचे महत्त्व लोकांना पटवून द्यावे हा या मोहिमेचा उद्देश असल्याचे बडगुजर यांनी सांगितले आहे. १ जानेवारी ते १५ जानेवारी दरम्यान साजऱ्या केल्या जाणाऱ्या या रस्ता सुरक्षा सप्ताहात विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. शाळा व कॉलेजेसमधून मुलांचे प्रबोधन करणे, वाहतुकीचे नियम व त्याचे महत्त्व मुलांना समजावून सांगणे, शाऴांमधील परिवहन समित्यांची बैठक घेणे, स्कूल बसेसची तपासणी करणे व मार्गदर्शन करणे यांसारखे उपक्रम राबविले जाणार आहेत. या सप्ताहादरम्यान वाहनचालकांची नेत्रतपासणी व रक्तदाब चाचणी केली जाणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात वाहतूक नियमाची कठोर अंमलबजावणी केली जाणार आहे. यात हेल्मेट आणि सिटबेल्ट यांची तपासणी करणे, अवैध प्रवासी वाहतूक रोखणे, मद्यपान करून गाडय़ा चालवणाऱ्या चालकांवर कारवाई करणे आणि जादा मालवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करणे यांसारखे उपक्रम हाती घेतले जाणार असल्याचे बडगुजर यांनी सांगितले.यावेळी सूत्रसंचालन काँ. शरद पाटील यांनी केले तर या कार्यक्रमाचे आयोजन वाहतूक शाखेचे संजय पाटील, कैलास पवार, अरुण बागुल, संजय सूर्यवंशी, भूषण बाविस्कर, आदीनी केले होते.