अमळनेर (प्रतिनिधी) सध्या शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. यासाठी शेताच्या बांधावरील काडी कचरा पेटून बांधाची साफसफाई करीत आहे. यामुळे बांधावरील स्व मालकीची तसेच रस्त्याच्या कडेने शासकीय योजनेतून सामाजिक वनीकरण, वन विभाग व ग्रामपंचायत विभाग यांनी लाखो रुपये खर्च करून लागवड करून संवर्धन केलेल्या मोठ-मोठ्या उंच व हिरवीगार जगवलेल्या झाडांना या बांधाला आग लावण्याच्या प्रकारामुळे जैवविविधता नष्ट होत आहे.
पावसाळ्यात दरवर्षी महाराष्ट्र शासन जून जुलै महिन्यात मोठा गाजावाजा व लाखो रुपयाची जाहिरात बाजी करून कोट्यावधी रुपये खर्च करून सर्व शासकीय विभागांच्या अंतर्गत लाखो वृक्षांची लागवड करत असतात. त्यात प्रामुख्याने सामाजिक वनीकरण व वन विभाग यांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर असतो. या विभागांतर्गत असलेल्या शासकीय नर्सरी मध्ये नीम, चिंच, करंज,आवळा ,खैर ,बांबू, गुलमोहर,रेन ट्री इत्यादी विविध प्रकारची लाखो जंगली वृक्षांची रोपे तयार केली जातात. व या विभागामार्फत इतर विभागांना तसेच ग्रामपंचायतींना पावसाळ्यात रोपे वाटप करण्यात येतात .तसेच या दोन्ही विभागांमार्फत मोठ्या प्रमाणावर दरवर्षी वृक्ष लागवड करण्यात येते. सामाजिक वनीकरण विभागामार्फत रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात येते व वन विभागा अंतर्गत वनविभागाच्या हद्दीत देखील मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली जाते.त्यानंतर वर्षभर वृक्ष संगोपनावर लाखो रुपये खर्च करून ती जगवण्याची जबाबदारी या दोन विभागवर जास्त असते. त्यात किती वृक्ष लावली व किती जगली हा एक संशोधनाचा भाग असून कोणत्या वर्षी किती वृक्ष लागवड केली व त्यावर किती खर्च झाला. याची आकडेवारी फक्त शासकीय कागदावरच असते. प्रत्यक्षात वृक्ष जगण्याची संख्या ही नगण्य असते. व त्या नगण्य जगलेल्या वृक्षांची उन्हाळ्यामध्ये या बांध पेटवण्याच्या प्रकारामुळे संख्या देखील कमी होत असते. या प्रकारावर शासकीय नियंत्रण आणण्यासाठी ग्राम पातळीवरच वृक्ष संगोपन समिती स्थापन करून ज्या शेतकरी बांधवांना शेतातील केरकचरा पेटवायचा असल्यास त्यांनी या समितीस प्रथमतः माहिती द्यावी.मग आपल्या शेतातील केरकचरा काळजीपूर्वक पेटवावा. त्यानंतर देखील झाडांना हानी अथवा इजा झाल्यास संबंधितावर वर या समितीनेच कायदेशीर कारवाई करून दंडवसूल करावा. जेणेकरून बांधावरील काडीकचरा जाळताना शेतकरी काळजी घेतील. काडी कचरा जाळल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. जमिनीतील सेंद्रिय घटक नष्ट होतात. वनस्पती पुनर्निर्मितीला बाधा येते. आगी नंतर उघड्या पडलेल्या जमिनीवर पावसाचे पाणी थेट वेगाने पडते. मातीचा थर पाण्याच्या प्रवाहात वाहून जातो. यामुळे जमिनीची सुपीकता नष्ट होते याविषयी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी.अशी मागणी वृक्षसंवर्धन व पर्यावरण प्रेमी लोकांकडून व्यक्त होत आहे.
अशी होते जैवविविधता नष्ट
आगेची आस लागून या झाडांना ईजा हून ही झाडे मृत होत आहेत. या आगीमुळे अनेक वनौषधी, सरपटणारे प्राणी,कीटक, मुंगी तृणभक्षी प्राणी ,पक्षी व त्यांची अंडी ,घरटी जळून खाक होत असतात. त्यासोबतच जैवविविधता नष्ट होत आहे. या सर्रास दिवसा आग लावणाच्या प्रकाराकडे कोणत्याही शासकीय विभागाचे लक्ष नसल्याने तालुक्यात शेकडो झाडांचे रोज नुकसान होत आहे.
शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणे आवश्यक
उन्हाळ्यामध्ये शेतीच्या बांधावरील झाडांना आग लागण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असते. यामुळे पर्यावरणाची हानी होते. याचा विचार कोणीही करत नाही. त्यामुळे यासाठी ग्रामस्तरावर समिती बनवून त्या समितीमार्फत शेतकऱ्यांमध्ये काडीकचरा जाळल्याने जमिनीतील सेंद्रिय घटक नष्ट होऊन त्यामुळे जमिनीची सुपीकता नष्ट होते.याबाबत जनजागृती करणे काळाची गरज आहे.
संजय माधवराव पाटील, शेतकरी, भरवस
झाडांना आग लागल्यास करणार शास्ती
शासकीय योजनेतून लावलेल्या झाडांना शेतीच्या बांधावरील कचरा जाळताना आग लागल्यास संबंधितावर कायदेशीर कारवाई करून शास्ती करण्यात येईल. त्याचप्रमाणे स्थानिकांच्या मदतीने जंगल संपत्तीची हानी होऊन त्याचे होणारे दुष्परिणाम याबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यात येईल. तसेच प्रत्येकाने पर्यावरण संरक्षणासाठी काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
बी. व्ही. पाटील, वनक्षेत्र अधिकारी, सामाजिक वनीकरण, अमळनेर