बॉम्ब डिस्पोजल पथकाने स्फोटक गोळ्यांचे नमुने नेले तपासणीस, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मांडळ येथे स्फोटक गोळे आढळून आले. एका कुत्र्याने गोळा तोंडात घेऊन त्याला चावण्याचा प्रयत्न केला असता गोळ्याचा स्फोट होऊन तोंडाच्या चिंधड्या उडून त्याचा मृत्यू झाला आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण झाली आहे. याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान जळगाव येथून बॉम्ब डिस्पोजल पथकाने दाखल होत स्फोटक गोळ्यांचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील मांडळ गावाबाहेर वावडे रस्त्यालगत मोकळ्या जागेवर २२ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास बुधा कोळी यांचे ट्रॅक्टर जात असताना ट्रॅक्टर खाली गोळा आल्याने त्याचा स्फोट होऊन जाळ झाला. कानठळ्या बसवणारा आवाज झाला. सुरुवातीला काय झाले हो कोणाला कळेना. काही वेळाने एक कुत्रा त्याठिकाणी आल्यावर त्याने पडलेला गोळा खाण्याचा प्रयत्न केला असता कुत्र्याच्या तोंडातच स्फोट झाल्याने तोंडाचे तुकडे होऊन कुत्र्याचा जागीच मृत्यू झाला. पुन्हा आवाज झाला आणि त्या गोळ्यातून गॅस बाहेर आल्याने बॉम्ब असल्याचा संशय येऊन ग्रामस्थ घाबरले. आणखी काही गोळे पडलेले पाहून ग्रामस्थ जवळ जायला घाबरत होते. सुरेश ठेलारी याने धाडस करून एका गोळ्यावर काठी मारण्याचा प्रयत्न केल्यावर पुन्हा एका गोळ्याचा स्फोट झाला. एकूण दहा गोळे असावेत. त्यापैकी तीन फुटले होते. ग्रामस्थांनी प्रांताधिकारी महादेव खेडकर , डी वाय एस पी सुनील नंदवाळकर ,सहा पोलिस निरीक्षक शितलकुमार नाईक याना माहिती कळवली. घटनास्थळी पोलिसांनी दाखल होत परिस्थिती हाताळली. तर जळगाव येथून बॉम्ब डिस्पोजल पथकाने येऊन फोटो गोळ्यांचे नमुने तपासणीसाठी नेले. या गोळ्यांची प्रयोगशाळा तपासणी केल्यानंतर नेमका काय प्रकार आहे, हे समोर येईल. तर नागरिकांनी भीती न बाळगता काळजी घ्यावी, असे काही प्रकार आढळून आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.