अमळनेर (प्रतिनिधी) यंदा मे महिन्यात मूहुर्त नाहीत, त्यामुळे काळानुरूप मानसिकतेत बदल करून पौष महिन्यात शुभमंगल उरकरण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे पुरोहितांकडून मुहूर्त काढून लग्नाची तयारी अनेक ठिकाणी होताना दिसत आहे.
पौष हा एक भारतीय पंचांगानुसार वर्षातील दहावा महिना आहे. हा महिना तीस दिवसाचा असतो. साधारणतः पौष महिना हा ग्रेगोरियन कॅलेंडरच्या डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात येतो. पूर्वीच्या काळापासून पौष महिन्यात शुभ कार्य न करण्याचा प्रघात आहे. या महिन्यात लग्नाव्यतिरिक्त, साखरपुडा, नवीन घराची घरभरणी, नवीन विहिर व घराचे बांधकाम करणे, इत्यादी शुभ कार्य करण्यास मनाई आहे. पौष महिन्याला अध्यात्मिक दृष्ट्या विशेष महत्त्व असल्याने या महिन्याला शुभ मानले जाते. या महिन्यात सूर्याची उपासना केल्याने तुमच्या जीवनावर सकारात्मक आणि आशादायक परिणाम होऊ शकतात.व शुभ फळ मिळते. असे सांगितले जाते.
पण यावर्षी मे महिन्यात शुभ कार्यासाठी मुहूर्त नाहीत. त्यामुळे एप्रिलपर्यंत असलेला मुहूर्त पहिला जात आहे. त्यामुळे पौष महिन्यातील मुहूर्त साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. पौष महिना दि. १२ जानेवारी पासून सुरू झाला असून दि. ८ फेब्रुवारीपर्यंत आहे. दि. १६ जानेवारीपासून लग्नाचे मुहूर्त सुरू झाले आहेत. यावर्षी पौष महिन्यात लग्नाचे १७ मुहूर्त आहेत. सकाळी, दुपारी गोरख मुहूर्त साधण्यासाठी यजमानांची लगबग सुरू आहे. विविध पंचागांतील आपत्कालीन मुहूर्ताच्या अनुषंगाने एखादा मुहूर्त निश्चित करून या दिवशी लग्नसोहळा उरकला जात आहे. आधुनिक विचारसरणी असणारे नोंदणी पद्धतीने लग्न करतात. त्यासाठी मुहूर्त पाहिला जात नाही मात्र काही मंडळी मुहूर्त पाहून नोंदणी विवाह करतात. शासकीय विवाह नोंदणी कार्यालयात प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन अर्ज करून नोंदणी विवाह करतात. त्यामुळे काळानुरूप आपल्या मानसिकतेत बदल करून पौष महिन्यातही शुभमंगल सावधानचा धुमधडाका दिसून येत आहे.
सूर्य मकर राशीत असेल शुभकार्यास योग्य
पौष महिना हा मलमास समजला जातो. परंतु पौष महिन्यात सूर्य धनु राशीत असेल तर कार्य करू नये. व सूर्य मकर राशीत असेल तर त्याचे मलमासत्व जाऊन तो शुभकार्यास योग्य होतो. म्हणून विवाह आधी मंगलकार्य या महिन्यात करता येतील.
–उदय सदाशिव पाठक, गुरुजी, ज्योतिष शास्त्री
पौष महिन्यातील मुहूर्तावर लग्न कार्याची तयारी
यावर्षी मे महिन्यात मुहूर्त नाहीत. त्यामुळे एप्रिलपर्यंत मुहूर्त पाहिले जात आहेत. त्यातच मंगल कार्यालय, केटरिंग सुविधा उपलब्ध होईल. तेव्हाचा मुहूर्त पाहिला जात आहे. वर व वधु पित्यांकडून पौष महिन्यातील मुहूर्तावर लग्न कार्य करण्याची तयारी दर्शवली जात आहे.
–कैलास पाटील, नर्मदा रिसॉर्ट