अमळनेर (प्रतिनिधी) चाकू दाखवून जबरी लूट, चोरी करणाऱ्या रमण उर्फ माकू बापू नामदास (वय २२) याच्यावर एमपीडीए कारवाई करून त्याला कोल्हापूर येथील कारागृहात रवाना करण्यात आले आहे.
गेल्या वर्षभरात सात जणांवर एमपीडीए कारवाई करण्यात आली आहे. रमण उर्फ माकू (रा. रेल्वे स्टेशन रोड) हा चाकू दाखवून जबरी चोरी ,लूट करीत होता. त्याच्यावर पाच गुन्हे दाखल होते. प्रतिबंधात्मक कारवाई करून देखील त्याच्या वर्तनात बदल झाला नव्हता म्हणून तत्कालीन पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी माकू विरुद्ध एमपीडीए चा प्रस्ताव डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांच्या मार्फत पोलीस अधिक्षकांकडे पाठवला होता. तेथून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे गेल्यावर त्यांनी प्रस्ताव मंजूर केला. विद्यमान पोलीस निरीक्षक विकास देवरे ,हेडकॉन्स्टेबल किशोर पाटील , कॉन्स्टेबल रवी पाटील , दीपक माळी यांनी आरोपी माकुला पकडून अटक केली. पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ यांनी २९ रोजी त्याला कोल्हापूर कारागृहात जमा केले. आतापर्यंत अमळनेर शहरात सात जणांवर एमपीडीए कारवाई करण्यात आल्याने गुन्हेगारी क्षेत्रात शांतता आहे.