गोशाळांना औषधी तसेच पशु वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून देणार
अमळनेर (प्रतिनिधी) गोशाळांना औषधी तसेच पशु वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून देत जिल्ह्यातील पाचही पशु रुग्णवाहिका सुरू करण्यात येतील, अशी माहिती जळगावचे पशुसंवर्धन उपायुक्त श्यामकांत पाटील यांनी गोसेवा संघाच्या सदस्यांना दिली.
शासनाने जनावरांच्या मोफत आरोग्य सेवेसाठी राज्यात ८० अद्ययावत पशु रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र त्यासाठी लागणारी औषधी आणि पशु वैद्यकीय अधिकारी ,चालक उपलब्ध नसल्याने पशु रुग्णवाहिका कुचकामी ठरल्या होत्या. सर्व पशु रुग्णवाहिका धूळ खात पडल्या आहेत. गोशाळेच्या गायींना वेळेवर उपचार मिळत नव्हते तर मोकाट जनावरांकडे दुर्लक्ष होत होते. जय जिनेद्र फाउंडेशनचे राजकुमार छाजेड यांनी याबाबत आरोप करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार जिल्ह्यातील ५८ गोशाळा चालक राजकुमार छाजेड यांच्यासह प्रवीण पाटील, दीपक पाटील, रमेश बाफना, विनायक सोनवणे, डॉ. बन्सीलाल दुगड, राजेंद्र कोळी, प्रताप सोनवणे, विशाल देवरे ,शेखर कानडे, पंडित, संदीप महाराज ,गोकुळ कोळी , दिनेश सोनार यांनी जिल्हाधिकारी कार्यालय ,पशुसंवर्धन उपायुक्त , जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला. त्यावर पशुसंवर्धन उपायुक्त श्यामकांत पाटील यांनी मोर्चेकऱ्यांना उत्तर देताना सांगितले की पुण्याचे पशुसंवर्धन आयुक्त देवेंद्र यादव यांनी दखल घेतली असून येत्या दहा दिवसांत जळगाव जिल्ह्यासाठी पाच पशु रुग्णवाहिका सुरू करण्यात येतील त्यासाठी चालक व पशु वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून दिले जातील असे निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील गोशाळांमधील जनावरांचे ,गायीचे लसीकरण, ट्यागिंग, अत्यावश्यक औषधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही श्यामकांत पाटील यांनी सांगितले.
बोगस गोसेवकांवर कारवाई करण्याची मागणी
मोर्चेकऱ्यांनी पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन बोगस गोसेवकांवर कारवाई करण्याची मागणी केली. व कत्तलखान्यात जाणाऱ्या गायी रोखण्यासाठी पोलिसांचे सहकार्य मिळत नव्हते अशी तक्रार केली. त्यावेळी पोलीस अधीक्षक एम रामकुमार यांनी याबाबत दखल घेतली जाईल, असे सांगताना गौरव्यवहार केल्यास तुमच्यावरही गुन्हा दाखल करेल, असेही कडक शब्दात सांगितले.