जळगाव (प्रतिनिधी) स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान, जळगाव आयोजित “खान्देश कुमार साहित्य संमेलनात” स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल येथील विद्यार्थ्यांने काव्यवाचन स्पर्धेत यश मिळवले. खान्देशातील बालसाहित्य चळवळ वृद्धिंगत होण्यासाठी विवेकानंद प्रतिष्ठान पुरस्कृत ‘कुमार साहित्य संमेलन’ हे साहित्यिकांसाठी आकर्षण ठरत आहे. यावर्षी हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा राज्यभिषेक सोहळा या संकल्पनेवर आधारित ७ वे कुमार साहित्य संमेलन जळगाव येथे आयोजित केलेले आहे. संमेलनात विविध साहित्यप्रकार अर्थात काव्यवाचन, कथा-कथन, परिसंवाद , अभिवाचन अशा विविध सत्रांचे आयोजन केलेले आहे. या संमेलनात दि. १६ डिसेंबर २०२३ रोजी जळगाव जिल्ह्यातील विविध शाळांमधील सुमारे 326 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. त्यात अमळनेर येथील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल इयत्ता ६ वी चा विद्यार्थी मिथिलेश प्रवीण सूर्यवंशी याने काव्यवाचन स्पर्धेत प्रथम दहा विद्यार्थ्यांमध्ये येण्याचा मान पटकावलेला आहे. या विद्यार्थ्याला शाळेचे प्राचार्य विनोदकुमार अमृतकर तसेच मराठी शिक्षक प्रशांत कापडणे यांचे मार्गदर्शन लाभले.