आता भ्रष्टाचाराच्या केलेल्या पापाचे प्रायचित्त म्हणून निलंबन आणि थेट बडतर्फसाठी खबरीलालचा पाठपुरावा
अमळनेर (खबरीलाल विशेष) येथील शासकीय रेशन गोडाऊनमध्ये व्यवस्थापक चोर अनिल पाटील दरमहा गरिबांच्या धान्याचा काळाबाजार करीत कसा भ्रष्टाचार करीत आहे, याचा भांडाफोड खबरीलालने केला आहे. त्यानंतर त्याचा पाठपुरावा करत अखेर प्रशासनाने अनिल पाटील यांचा गोडाऊन व्यवस्थापक म्हणून पदभार काढून जणू त्यांना तेथून हद्दपार केले आहे. हे खबरीलालचे पहिले यश असून आता त्यांनी भ्रष्टाचाराच्या केलेल्या पापाचे प्रायचित्त म्हणून निलंबन आणि थेट बडतर्फ करण्यासाठी खबरीलालचा पाठपुरावा सुरूच राहणार आहे. वेळप्रसंगी न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची वेळ आली तरी खबरीलालने तयारी केली आहे.
अमळनेर येथील शासकीय रेशन गोडाऊनमध्ये व्यवस्थापक अनिल पाटील रुजू झाल्यापासून शेकडो क्विंटलचा अवैध धान्य साठा जमवून भ्रष्टाचार करीत असल्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या पथकाने केलेल्या कारवाईत स्पष्ट झाले आहे. त्यानंतर खबरीलालच्या तक्रारीवरून प्रांताधिकारी यांनीही टाकलेल्या छाप्यात ते उघड झाले आहे. एवढेच नव्हे तर या संदर्भात खबरीलालने गोपनीय तक्रार करून होणारा भ्रष्टाचार उघडकीस आणला आहे. यात तत्कालीन तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, तहसीलदार सुराणा, पुरवठा निरीक्षक बावणे यांचाही सहभाग असल्याने या भ्रष्टाचाराची पाळेमुळे खोलवर रोवली आहेत. ही खोलवर गेलेली भ्रष्टाचाराची मुळे उपटून फेकण्यासाठी खबरीलालने सततचा पाठपुरावा सुरू ठेवला आहे. तरीही व्यवस्थापक अनिल पाटील यांच्यावर का कारवाई होत नाही? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडणे साहजिकच आहे. मात्र आता या प्रक्रियेला वेग आला असून अनिल पाटील यांचा पदभार काढण्यात आल्याने हे पहिले यश आहे.
कारवाईसाठी कोणत्या मंत्री, पुढाऱ्याचा दबाव?
गोडाऊन व्यवस्थापक अनिल पाटील यांच्यावर कारवाईसाठी खबरीलाल सततचा पाठपुरावा करीत असतानाही स्थानिकसह जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सर्वांकडूनच चालढकल का सुरु आहे, याचा खबरीलालने शोध घेतला असता गोडाऊन व्यवस्थापक अनिल पाटील यांनी जिल्ह्यातील एका पुढाऱ्यांला “पाच” प्लेट तांदूळ खाऊ ‘मंत्रू’न खाऊ घातल्याचे समोर आले आहे. या मंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई न करण्याचा दबाव टाकला आहे. त्यामुळेच जिल्हाधिकारी कारवाई करण्यास टाळत आहेत. शासकीय योजनांच्या कामांचा डिंग्या मारून चमकोगिरी करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांनी भ्रष्टाचाराला आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना खतपाणी न घालता त्यांच्यावर कारवाई केली तर सर्वसामान्य जनता निश्चितच त्यांचे कौतुक करेल जिल्हाधिकारीच अशा मंत्र्यांच्या आणि नेत्यांच्या दबावाला बळी पडून काम करत असेल तर सर्वसामान्यांनी न्याय कोणाकडे मागावा असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर कोणत्या मंत्र्याने व पुढाऱ्याने अनिल पाटील कडून “पाच प्लेटा तांदूळ खाल्ला” त्यालाही लवकरच एक्सपोज करणार आहोत.
अखेर जिल्हाधिकारी कार्यालयातून फाईलची हालचाल
गेल्या महिन्यापासून भ्रष्ट अनिल पाटील यांच्यावर कारवाई संदर्भातील फाईल जिल्हाधिकारी कार्यालयात धूळ खात पडून होती. तिला मुद्दामूनच अडगडीत टाकून दडपण्यात आली होती. अखेर खबरीलालने जिल्हाधिकारी कार्यालय गाठुन संबंधित यंत्रणेला धारेवर धरल्यावर आणि जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारल्यावर ही भ्रष्टाचाराची फाईल हलली. त्यानंतर पहिली कारवाई म्हणून अनिल पाटील यांचा गोडाऊन व्यवस्थापक म्हणून कारभार काढण्यात आला. खबरीलाल एवढ्यावरच थांबणार नाही. अनिल पाटील यांना घरी पाठवण्यात खबरीलालचा पाठपुरावा सुरूच राहील.
खालपासून वरपर्यंत सर्वांना द्यावे लागते म्हणून भ्रष्टाचार !
अनिल पाटील यांच्यावर आधीच कारवाईची टांगती तलवार असतानाही भ्रष्टाचार करण्यात त्यांनी अजूनही सोडलेले नाही. नुकताच एका रेशन दुकानदाराकडे 29 क्विंटल अवैध धान्यसाठा अनिल पाटील यांनी टाकल्याने बोंबाबोंब झाली. अनिल पाटील यांनी एका रेशन दुकानदाराचा बळी घेण्याचा प्रयत्न केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी अनिल पाटील यांची झाडाझडती घेतली. खालपासून वरपर्यंत सर्वांनाच पैसे द्यावे लागतात म्हणून मला हे धंदे करावे लागतात, असे अनिल पाटील यांनी निर्लज्जपणे उत्तर दिल्याचे खबरीलालच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. यामुळे आपण भ्रष्टाचार करीत असल्याचे अनिल पाटील यांनी एक प्रकारे कबुलीच दिली आहे.
मंगरूळ येथील 35 क्विंटल धान्याचे काय?
अनिल पाटील यांच्याच भ्रष्टाचाराचे पाप म्हणून तालुक्यातील मंगरूळ येथील रेशन दुकानदाराकडे टाकण्यात आलेला ३५ क्विंटल अवैध धान्य साठ्याचा पंचनामा करून तो अजूनही तसाच पडून आहे. तहसीलदार सुराणा आणि पुरवठा निरीक्षक बावने हे अनिल पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करतील का, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करीत आहे. या त्यांचे हात ओले असल्याने त्यांनी कोणतीही कारवाई न केल्यास खबरीलाल त्यांच्यावर कारवाईसाठी पाठपुरावा करणार आहे.